कधीही या कधीही जा, कार्यालय आपलेच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:05 AM2021-07-30T04:05:26+5:302021-07-30T04:05:26+5:30
सुनील घोडके खुलताबाद : कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी पद्धती शासनाने जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांत बसविली आहे; मात्र खुलताबाद ...
सुनील घोडके
खुलताबाद : कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी पद्धती शासनाने जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांत बसविली आहे; मात्र खुलताबाद तालुक्यातील अनेक कार्यालयांनी ही मशीन काढून ठेवल्याने अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलीच मोकळीक मिळाली आहे. ‘कधीही या कधीही जा, कार्यालय आपलेच...’ अशी पद्धत सध्या सुरू आहे.
शासकीय व खासगी कार्यालये व कंपनीत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेवर कार्यालयात हजेरी लावावी, याकरिता बायोमेट्रिक हजेरी पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. खुलताबाद तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांत बसविलेल्या बायोमेट्रिक पद्धतीचा कसा वापर होतो, याबाबत पाहणी केली असता, जवळपास सर्वच कार्यालयांतील बायोमेट्रिक मशीन अडगळीत पडली असून, हजेरी मस्टरचाच सर्रास वापर केला जात असल्याचे आढळून आले.
खुलताबाद नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात बसविण्यात आलेल्या बायोमेट्रिक मशीन गेल्या दीड वर्षांपासून खराब झाल्याचे कारण दाखवित काढून टाकण्यात आली आहे. येथे हजेरी मस्टरवरच उपस्थितीत कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. यामुळे कधीही या कधीही जा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
खुलताबाद पंचायत समिती कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे कारण देत गेल्या दोन वर्षांपासून बायोमेट्रिक हजेरी पद्धतीचा वापर बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावले आहे.
खुलताबाद तहसील कार्यालयातील बायोमेट्रिकचा वापर केला जात नाही. येथील बायोमेट्रिक पाच वर्षांपासून काढून टाकण्यात आले आहे. या ठिकाणीही हजेरी मस्टरवरच उपस्थित कर्मचारी स्वाक्षरी करीत असल्याचे आढळून आले.
खुलताबाद येथील जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांत बायोमेट्रिक नुसती नावालाच असून, अधिकारी, कर्मचारी आपल्या मर्जीप्रमाणे ये-जा करीत असतात. सर्वसामान्य नागरिक कार्यालयीन कामकाजासाठी कार्यालयात येतात, तेव्हा कर्मचारी जागेवर दिसत नाहीत.
तालुक्यातील ९९ टक्के कर्मचारी करतात अप-डाऊन
खुलताबाद येथील सर्वच कार्यालयातील जवळपास ९९ टक्के कर्मचारी हे औरंगाबाद शहर परिसरातून अपडाऊन करीत असतात. यात उशिरा येणे व लवकर जाण्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शासनाने गेल्या काही वर्षांपासून पाच दिवसांचा आठवडा केला असला तरी, पाच दिवसांतून दोन तीन दिवसच कार्यालयात येणारे अनेक महाभाग आहेत.
एक दिवसाचे वेतन होत होते कपात
एक शासकीय कर्मचाऱ्यास बायोमेट्रिक का बंद करण्यात आले, त्याचा वापर का होत नाही, असे विचारले असता, दोन ते तीन दिवस या मशीनवर हजेरी लावली नाही तर, एक दिवसाचे वेतन कपात होत असल्याचे त्याने सांगितले.
फोटो कॅप्शन : १) खुलताबाद नगर परिषदेतील या ठिकाणी असलेले बायोमेट्रिक दोन वर्षांपासून काढून टाकण्यात आले आहे.
२) खुलताबाद तहसील कार्यालयातील या ठिकाणची बायोमेट्रिक काढण्यात आली आहे. (बाजूला महसुलचा फलक)