सकाळी दिल्लीला जा, संध्याकाळी औरंगाबादला या; नव्या विमानसेवेस प्रवाशांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 12:53 PM2021-12-02T12:53:25+5:302021-12-02T12:56:27+5:30
औरंगाबादेत आणखी एका विमानसेवेची भर पडली आहे.
औरंगाबाद : इंडिगोने बुधवापासून सकाळच्या वेळेत सुरु केलेल्या दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमानसेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या विमानसेवेमुळे दिल्लीला एका दिवसात ये-जा करणे शक्य झाले आहे. त्याबरोबरच दिल्लीहून कनेक्टिंग फ्लाईटने पाटना, जयपूर, डेहराडून, श्रीनगर आदी ठिकाणी जाणेही शक्य झाले आहे.
इंडिगोने १८० आसन क्षमतेच्या विमानाद्वारे ही सेवा सुरु केली आहे. पहिल्या दिवशी या विमानाने दिल्लीहून ५० प्रवासी औरंगाबादेत दाखल झाले. तर १२२ प्रवासी औरंगाबादहून दिल्लीला गेले. औरंगाबादेत आणखी एका विमानसेवेची भर पडली आहे. हे विमान पहाटे ५.१५ वाजता दिल्लीहून उड्डाण घेईल आणि सकाळी ७.१५ वाजता औरंगाबादेत येईल. त्यानंतर, सकाळी ७.४५ वाजता औरंगाबादहून उड्डाण घेईल आणि सकाळी ९.३५ वाजता दिल्लीस पोहोचेल.
बंगळुरु, अहमदाबाद विमानसेवेची प्रतीक्षा
गतवर्षी कोरोना सुरु झाल्यानंतर विमानसेवा ठप्प झाली होती. त्यानंतर दिल्ली, मुंबई आणि हैदराबादची विमानसेवा पूर्ववत झाली. परंतु बंगळुरू आणि अहमदाबादची विमानसेवा सुरु होण्याची अजूनही प्रतीक्षाच आहे. ही दोन्ही विमाने व त्याबरोबर मुंबईसाठी आणखी एक विमानही सुरु होण्याची चिन्हे आहेत.