गो-ग्रीन! २१ हजारांहून अधिक ग्राहकांचा छापील वीज बिलांना 'टा-टा'

By साहेबराव हिवराळे | Published: May 23, 2024 07:45 PM2024-05-23T19:45:17+5:302024-05-23T19:45:37+5:30

‘गो-ग्रीन’द्वारे वीजग्राहकांची २६ लाख रुपयांची वार्षिक बचत

Go-Green! More than 21 thousand customers 'ta-ta' printed electricity bills | गो-ग्रीन! २१ हजारांहून अधिक ग्राहकांचा छापील वीज बिलांना 'टा-टा'

गो-ग्रीन! २१ हजारांहून अधिक ग्राहकांचा छापील वीज बिलांना 'टा-टा'

छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेंतर्गत वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडणाऱ्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील पर्यावरणस्नेही २१ हजार ५४० ग्राहकांकडून २५ लाख ८४ हजार ८०० रुपयांची वार्षिक बचत सुरू आहे.

महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेनुसार वीजग्राहकांनी छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीज बिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते 'गो-ग्रीन'मधील ग्राहकांना 'ई-मेल'द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच 'एसएमएस'द्वारे देखील वीज बिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना ‘प्रॉम्प्ट पेमेंट’चा लाभ घेणे अधिक शक्य झाले आहे. गो-ग्रीन योजना ही काळाची गरज आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

११ हजार २३७ ग्राहक 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी

छत्रपती संभाजीनगर परिमंडलांतर्गत छत्रपती संभाजीनगर शहर मंडळात ११ हजार २३७ ग्राहक 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडळात 'गो-ग्रीन'मध्ये ६ हजार ७८० ग्राहक सहभागी आहेत. तसेच जालना मंडळातील ३ हजार ५२३ ग्राहकांनी 'गो-ग्रीन'मध्ये सहभाग घेतला आहे.
चालू वीज बिलासह मागील ११ महिन्यांची वीज बिले..

महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या लिंकवर जाऊन करावी. 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीज बिलासह मागील ११ महिन्यांची वीज बिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

Web Title: Go-Green! More than 21 thousand customers 'ta-ta' printed electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.