जा बेटा...बदला घेऊनच परत ये; सुटीवर आलेल्या जवानाला आई-वडिलांनी तात्काळ केले रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:49 PM2019-02-19T12:49:10+5:302019-02-19T13:10:57+5:30
सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील कौतिक काशीनाथ पांढरे यांची दोन मुले सैन्यात आहेत.
- कैलास पांढरे ।
औरंगाबाद : पुलवामा हल्ल्याची बातमी कळताच सुटी घेऊन गावी आलेल्या जवानाला त्याच्या आई-वडिलांनी सुटी न भोगता चक्क देशरक्षणासाठी कर्तव्यस्थळी जाण्याचा आग्रह केला. या जवानानेही आपल्या ४४ बांधवांच्या मृत्यूमुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लगेच गाव सोडले. जा बेटा जा...बदला घेऊनच परत ये, असे म्हणून आई -वडिलांसह गावकऱ्यांनी या जवानाला सत्कार करुन सीमेवर रवाना केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथे रविवारी घडली.
सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील कौतिक काशीनाथ पांढरे यांना चार मुले असून यातील दोन मुले सैन्यात आहेत. सुधाकर हा २००९ मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाला, तर अविनाश हा २०१५ मध्ये भरती झाला. सुधाकर सध्या ओडिशामध्ये, तर अविनाश हा जम्मूमधील नौसेरा सेक्टरमध्ये देशसेवेसाठी अहोरात्र झटत आहे. हल्ल्याच्या ३ दिवसांपूर्वीच अविनाश हा सुटीवर गावी आला होता. आठ -दहा दिवस गावाकडे राहून परिवारासोबत आपली सुटी घालवायच्या इराद्याने आलेल्या अविनाशला हल्ल्याची खबर लागली. त्याच्या वडिलांनी अविनाशला कडाडून मिठी मारुन ‘बेटा अवी, तुला आता ड्युटीवर हजर व्हायला पाहिजे’ असे म्हणून रवाना होण्यास सांगितले.
वडिलांच्या निर्णयाचे ग्रामस्थांनी भरभरुन कौतुक केले. ग्रामस्थांनी अविनाशची गावातून मिरवणूक काढून देशभक्तीपर घोषणा दिल्या व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून अविनाशचा हौसला बुलंद केला. यावेळी महिलांनीही अविनाशचे औक्षण करुन देशसेवेसाठी आशीर्वाद दिला. सध्या देशावर संकट आले असून मी माझी दोन्ही मुले देशसेवेसाठी अर्पण केली असून अशा परिस्थितीत सुटी भोगण्यापेक्षा देशरक्षणासाठी जाणे महत्त्वाचे आहे, असे सांगताना अविनाशच्या वडिलांना गहिवरुन आले होते. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंतून देशभक्तीची ज्योत तेजावत होती. हे दृश्य पाहून गावात देशभक्तीची लाट आली होती. अविनाशने सर्वांचा निरोप घेऊन रविवारी रात्रीच गाव सोडले व तो सीमेवर लढण्यासाठी रवाना झाला.
दोन महिन्यांपूर्वीच झाला साखरपुडा
अविनाशचा दोन महिन्यांपूर्वीच कन्नड तालुक्यातील पळशी येथील खोटे परिवारातील तरुणीशी साखरपुडा झाला असून जेव्हा मोठी सुटी मिळेल तेव्हाच त्यांचा शुभविवाह ठरविला जाईल, असे अविनाशच्या वडिलांनी सांगितले.
पहा व्हिडिओ :