पतीचा छळ करणाऱ्या पत्नीला सद्बुद्धी देण्याचे देवाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:47 PM2019-06-15T22:47:55+5:302019-06-15T22:48:40+5:30
वर्षानुवर्ष चालत आलेल्या या परंपरेला पत्नीपीडित पुरुषांनी छेद देण्याचा प्रयत्न
वाळूज महानगर : पतीचा छळ करणाऱ्या पत्नीला सद्बुद्धी दे म्हणत सिडको वाळूज महानगरात शनिवारी (दि.१५) पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारून अनोख्या पद्धतीने पिंपळ पौर्णिमा साजरी केली.
वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला सात जन्मी हाच पती मिळू दे व पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून मनोभावे पूजा करतात. मात्र, वर्षानुवर्ष चालत आलेल्या या परंपरेला पत्नीपीडित पुरुषांनी छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. लग्नानंतर महिलांनाच त्रास होतो, अशी सामाजिक धारणा आहे; पण महिलांकडून पुरुषांना त्रास होतो याचा सहसा कोणी विचार करीत नाही; पण महिलांनी कायद्याचा गैरवापर करून पतीसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याची अनेक उदाहरणे आहेत. काहीही संबंध नसताना या खोट्या तक्रारीमुळे न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याने, तसेच जिवापाड जपलेल्या पोटच्या मुलांपासून दूरू राहावे लागत असल्याने अनेक पत्नीपीडित पुरुष नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. या नैराश्यातून अनेक पत्नीपीडित पुरुष आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेत आहेत. समाजव्यवस्थेच्या या विदारक परिस्थितीत पत्नीपीडित पुरुषांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्नीपीडित संघटना गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहे. पत्नीपीडितांना न्याय मिळावा यासाठी भारत फुलारे यांनी पुढाकार घेऊन वाळूज महानगरात आश्रम उभारला आहे. संघटनेच्या माध्यमातून या आश्रमात पत्नीपीडितांचे समुपदेशन करून त्यांना कायदेशीर लढा लढण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. याचबरोबर पत्नीपीडितांना न्याय मिळावा यासाठी वेगवेगळी आंदोलने केली जातात.
पत्नीला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना
वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला एकीकडे महिला पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यात दंग आहेत, तर दुसरीकडे मात्र पत्नीच्या छळाने त्रस्त असलेले पीडित पुरुष एकत्र येऊन मागील वर्षापासून वेगळ्या पद्धतीने पिंपळ पौर्णिमा साजरी करीत आहेत. यंदाही शनिवारी सिडको साईनगरातील पिंपळाच्या झाडाला पत्नीपीडित पुरुषांनी उलटे फेरे मारून पतीचा छळ करणाऱ्या पत्नीला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना केली, तसेच सात जन्मी हाच पती मिळू दे, असे खोटे सांगून छळ करणाऱ्या लबाड बायकोच्या त्रासातून मुक्त कर. खोट्या गुन्ह्यात अडकवून छळ करणारी बायको नको रे बाबा, असे म्हणत पिंपळाच्या झाडाप्रमाणे आम्हालाही मुंजे ठेव, असे यमराजाकडे साकडे घातले. यावेळी पत्नीपीडित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत फुलारे, बापू तरवटे, चरणसिंग गुसिंगे, शिवराज कांबळे, प्रवीण गाळे, पांडुरंग गांडुळे, जगदीश शिंदे, रामचंद्र बोपशेट्टी, भिकन चंदन, अॅड. प्रसाद, दिनेश मेव्हणकर, नीलेश भाले, संदीप घोळवे, भूषण डोळस, अॅड. डहाळे आदींची उपस्थिती होती.