गोदा-प्रवरा काठच्या मंदिरांना पाण्याचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:05 AM2021-09-26T04:05:51+5:302021-09-26T04:05:51+5:30
उन्हाळ्यात उघडी पडलेली मंदिरे पुन्हा पाण्याखाली... ७० च्या दशकात जायकवाडी धरण झाले अन् मंदिरे बुडीत क्षेत्रात गेली कायगाव : ...
उन्हाळ्यात उघडी पडलेली मंदिरे पुन्हा पाण्याखाली...
७० च्या दशकात जायकवाडी धरण झाले अन् मंदिरे बुडीत क्षेत्रात गेली
कायगाव : गेल्या काही दिवसांत गोदावरी आणि प्रवरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने पात्रानजीकच्या मंदिरांना वेढा घातला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उघडी पडलेली मंदिरे पुन्हा पाण्याखाली गेली आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून जायकवाडी धरण भरल्यानंतर बॅकवॉटरमधील अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्यात आहेत. मात्र उन्हाळ्यात नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात ओसरल्यावर यातील बहुतांश मंदिरे उघडी पडली होती. गेल्या काही दिवसांपासून जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहाकडून गोदावरी-प्रवराने येणाऱ्या पाण्याने नदीची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिणामी नदी पात्रानजीकच्या मंदिरांना पुन्हा पाण्याचा वेढा बसू लागला आहे.
जुने कायगाव येथील गोदावरी-प्रवरा नदीच्या पात्राजवळ अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत. यात रामेश्वर, मुक्तेश्वर, सिद्धेश्वर, कायेश्वर, घोटेश्वर, गौतमेश्वर आदी मंदिरांचा समावेश आहे. यातील उंचीवर असणाऱ्या रामेश्वर मंदिर आणि सिद्धेश्वर मंदिराला दोन बाजूंनी नदीच्या पाण्याने वेढा घातलेला आहे. तसेच या मंदिरांकडे ये-जा करण्यासाठी रस्ता असल्याने तेथे भविकांना दर्शनासाठी येण्या-जाण्याची अडचण नसते.
-----
मुक्तेश्वर, कायेश्वर गेले पाण्यात
मुक्तेश्वर मंदिर, कायेश्वर आणि गौतमेश्वर आदी मंदिरे पूर्णतः पाण्यात गेली आहेत. मुक्तेश्वर मंदिर मुख्य नदी पात्रात असल्याने जवळपास दहा फूट मंदिर पाण्यात बुडाले आहे. तर गौतमेश्वर आणि कायेश्वर मंदिराची उंची कमी असल्याने तीही पाण्याखाली गेली आहेत. घोटेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी भराव असल्याने अजून भाविकांना तेथे पोहोचता येते. मात्र मंदिराला तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढा घातला आहे.
---------
मंदिराचे अस्तित्व अजूनही टिकून
७० च्या दशकात जायकवाडी धरण झाले आणि ही सर्व मंदिरे बुडीत क्षेत्रात गेली. जायकवाडी धरण भरले की मंदिरे पाण्यात जातात आणि पाणी ओसरले, नदीतील पाणी पातळी कमी झाली की मंदिरे उघडी पडतात. गेल्या चाळीस वर्षांपासून असे सुरू आहे. मंदिरे पाण्याखाली गेली की, किमान चार-पाच महिने तरी यातील काही मंदिरे पाण्यातच राहतात. असे असूनही ही सर्व मंदिरे अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत.
----------
फोटो : जुने कायगाव परिसरातील गोदावरी पात्रात असणारी अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्यात गेली आहेत.
(रामचंद्र बिरुटे)
250921\170-img-20210925-wa0071.jpg
जुने कायगाव परिसरातील गोदावरी पात्रात असणारी अनेक लहान मोठी मंदिरे पाण्यात गेली आहे. (रामचंद्र बिरुटे)