गोदावरी नदी पैठणमध्ये दूषित
By Admin | Published: July 4, 2017 05:15 AM2017-07-04T05:15:40+5:302017-07-04T05:15:40+5:30
आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना गोदावरीच्या दूषित झालेल्या पाण्यात यंदा पवित्र स्नान करावे लागणार आहे. जायकवाडी
संजय जाधव/लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण (जि. औरंगाबाद) : आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना गोदावरीच्या दूषित झालेल्या पाण्यात यंदा पवित्र स्नान करावे लागणार आहे. जायकवाडी धरणावर असलेला जलविद्युत प्रकल्प महिनाभरापासून तांत्रिक अडचणीने बंद पडल्याने गोदावरी पात्रात महिनाभरापासून पाणी साचले असून, त्यात सांडपाणी येत आहे.
गोदापात्रातील पाण्यावर हिरवट व दुर्गंधीयुक्त असा तवंग दाटला आहे. या पाण्यात स्नान केल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने हे पाणी खाली सोडून द्यावे व वारकऱ्यांसाठी शुद्ध पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे. जायकवाडी धरणावर असलेला जलविद्युत प्रकल्प ४ जूनपासून बंद पडला आहे. त्यामुळे धरणातून गोदावरीत व पुन्हा धरणात पाणी लिफ्ट करण्याची प्रक्रिया थांबली आहे. सांडपाण्याचे दहा नाले गोदावरीच्या पात्रात येतात.
दहा नाल्यांचा गोदावरी संगम
पैठणमधील सांडपाणी वाहून आणणारे १० नाले दररोज लाखो लीटर घाण पाणी आणून सोडत आहेत. सोबतच रोज दशक्रिया विधीची हजारो किलो रक्षा पात्रात विसर्जित करण्यात येते. दूषित पाण्यात स्नान केलेल्या भाविकांना अंगास खाज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे, अंगार होणे अशा विविध त्वचा आजारास सामोरे जावे लागते.
जायकवाडी धरणावरील विद्युत प्रकल्पाची दुरुस्ती सुरू असून त्यासाठी आठ दिवस लागतील, असे जलविद्युत प्रकल्पाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्याधर लोणीकर यांनी सांगितले. गोदावरीच्या पात्रात पैठण शहराचे सांडपाणी नाल्याद्वारे मोठ्या
प्रमाणात येऊन मिसळते. त्यामुळे पाण्याचे युट्रॉफिकेशन (शेवाळीकरण) वाढले, अशी माहिती धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी या वेळी दिली.