गोदावरी खोऱ्यांतील पाणी नाशकात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 05:40 AM2018-09-19T05:40:47+5:302018-09-19T05:42:37+5:30
मराठवाडा विकास मंडळाने याबाबत वारंवार बैठका घेतल्या; परंतु त्याचा पाठपुरावा होत नसल्यामुळे सर्व काही जैसे थे आहे.
औरंगाबाद : कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्याबाबत वारंवार घोषणा होत आहेत. मात्र, त्याचे पुढे काहीही होत नाही. केंद्र शासनाच्या माध्यमातून कोकणपट्टा, दमणगंगा प्रकल्पाचे ५० टक्के टीएमसी पाणी गोदावरी खोºयात आणण्यासाठी तत्त्वत: मान्यता मिळाली आहे; परंतु ते पाणी नाशिक जिल्ह्यातच जिरले पाहिजे यासाठी पूर्णत: राजकीय प्रयत्न सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मराठवाडा विकास मंडळाने याबाबत वारंवार बैठका घेतल्या; परंतु त्याचा पाठपुरावा होत नसल्यामुळे सर्व काही जैसे थे आहे. नाशिकची यंत्रणा ५० टीएमसी पाणी उचलून गंगापूर, दारणा, वाघाड धरणांत ते पाणी घेणार असल्याची माहिती विकास मंडळातील काही सदस्यांना मिळाली आहे. गोदावरी पात्रात पाणी उचलून टाकण्यास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे; परंतु गोदावरी पात्र कुठचे? नाशिकचे की मराठवाड्याचे हे स्पष्ट केलेले नाही.
सव्वालाख हेक्टर सिंचनाखाली येणार
एका टीएमसीमध्ये किमान ३ ते ४ हजार हेक्टर जमिनीचे सिंचन होते. सध्या नाशिक जिल्ह्यातील यंत्रणा ४० टीएमसी पाणी उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे किमान १ लाख २५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मराठवाड्यावर मोठ्या प्रमाणात होणार आहे, अशी शक्यता जलतज्ज्ञांनी वर्तविली आहे.