घृष्णेश्वर कारखान्याच्या गोडावूनमधून सव्वाचार लाखाचे साहित्य लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:03 AM2021-09-03T04:03:31+5:302021-09-03T04:03:31+5:30
खुलताबाद : घृष्णेश्वर साखर कारखान्याचे गदाणा येथील गोडावूनचे शटर उचकटून सव्वाचार लाख रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली ...
खुलताबाद : घृष्णेश्वर साखर कारखान्याचे गदाणा येथील गोडावूनचे शटर उचकटून सव्वाचार लाख रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरी करणारा व खरेदी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.
प्रकाश गुलाबराव देशमुख यांनी खुलताबाद पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, २७ ऑगस्टच्या रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घृष्णेश्वर कारखान्याचे खतनापूर गदाना येथील गोडाऊनचे शटर उचकटून आतील ४ लाख २५ हजार ५४५ रुपयांचे साहित्य चोरून नेले. सदर गुन्ह्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचनामा केला. तपासाअंति खबऱ्याने ही चोरी सातारा परिसरांतील आरोपी शेख याकूब ऊर्फ रिजवान शेख सांडू याने दोन साथीदारांच्या मदतीने केल्याचे सांगितले. तसेच त्यांनी हा माल औरंगाबादेत एका व्यापाऱ्याला विकल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी राहत्या घरातून शेख याकूब यास ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखविताच त्याने इतर दोन साथीदारांच्या साहाय्याने चोरी केल्याचे मान्य केले. तसेच त्यांनी हे साहित्य रहेमानिया कॉलनी येथील सय्यद असीफ सय्यद सलीम यांना ३०० रुपये प्रतिकिलोने विकल्याचे सांगितले. पोलिसांनी सय्यद असीफ याच्याकडून २ क्विंटल २८ किलो वजनाच्या चोरीच्या साहित्यासह गुन्ह्यात वापरलेली रिक्षा (एम.एच.२०,डी.एस ३७०८) व दोन मोबाइल हॅन्डसेट असा एकूण २,६२,४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोनि. संतोष खेतमाळस, पोउनि. विजय जाधव, पोहेकॉ. संजय काळे, पोना. शेख नदीम, वाल्मीक निकम, पोकॉ. ज्ञानेश्वर मेटे, रामेश्वर धापसे, योगेश तरमाळे, संजय तांदळे यांनी केली.
फोटो कॅप्शन : गदाणा येथील घृष्णेश्वर काराखान्यातून चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.
020921\img-20210902-wa0051.jpg
गदाणा येथील घृष्णेश्वर कारखान्याच्या गोडावूनमधून सव्वाचार लाख रूपयांचे साहित्य लंपास करणारा व खरेदी करणा-या दोघांना गुन्हेशाखेने जेरबंद केले आहे. सोबत पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस व कर्मचारी