सोने ७३ हजार, चांदी ८७ हजारांवर; दिवाळीत आणखी भाव वाढणार !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 08:00 PM2024-08-24T20:00:51+5:302024-08-24T20:01:08+5:30
आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीचा परिणाम सोने-चांदीच्या किमतीत होत असतो.
छत्रपती संभाजीनगर : मागील अडीच महिन्यापासून सोन्याच्या भावात वाढ होत आहे. चांदीच्या भावातही उतार-चढाव बघण्यास मिळत आहे. मात्र, आता श्रावण महिना व सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. यामुळे बाजारात सध्यातरी खरेदीदार सक्रिय आहेत. एकीकडे भाव वाढत असताना दुसरीकडे खरेदीही जोमात सुरु आहे. तेजी असूनही ग्राहक टिकून राहणे अशी परिस्थिती पहिल्यांदाच बघण्यास मिळत असल्याचे ज्वेलर्सने सांगितले.
सोने-चांदीचे भाव काय ?
तारीख सोने (प्रति तोळा) चांदी (प्रति किलो)
१ जून---७२७५० रुपये--- ९०२१७ रुपये
१५ जून---७२९०० रुपये---८७८५० रुपये
१ जुलै---७२५०० रुपये---८७८०० रुपये
१५ जुलै---७३७२० रुपये---९२००० रुपये
१ ऑगस्ट--- ७०७०० रुपये---९४००० रुपये
१६ ऑगस्ट---७३१०० रुपये---८४५०० रुपये
२३ ऑगस्ट---७३५०० रुपये---८७००० रुपये
सोने तेजीत, चांदी मंदीत
मागील अडीच महिन्यात सोने तोळ्यामागे ७५० रुपयांनी वधारले तर चांदी किलोमागे ४२१७ रुपयांनी वाढली व नंतर ३२१७ रुपयांनी भाव कमीही झाले.
दिवाळीपर्यंत भाव वाढण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीचा परिणाम सोने-चांदीच्या किमतीत होत असतो. रशिया-युक्रेन युद्धाची आग भडकतच आहे. तर इस्राइल व गाझा युद्धाने तिसरे विश्व युद्ध सुरु होईल का अशी शंका व्यक्त केली जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दिवाळीपर्यंत सोने-चांदीचे भाव आणखी वाढतील. - गिरधरभाई जालनावाला ज्वेलर्स