बँकेच्या लॉकरमधून सोने गायब
By Admin | Published: July 1, 2014 11:14 PM2014-07-01T23:14:35+5:302014-07-02T00:19:05+5:30
कडा: आष्टी तालुक्यातील कडा येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेतील एका महिलेच्या लॉकरची बनावट चावी तयार करुन तत्कालिन शाखा व्यवस्थापक व इतर एका व्यक्तीन लॉकर उघडले.
कडा: आष्टी तालुक्यातील कडा येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेतील एका महिलेच्या लॉकरची बनावट चावी तयार करुन तत्कालिन शाखा व्यवस्थापक व इतर एका व्यक्तीन लॉकर उघडले. त्यातील पन्नास तोळे सोन्याचे दागिणे व इतर महत्वाची कागदपत्रे गायब झाल्याच्या आरोपावरुन बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापक व इतर एका विरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आष्टी पोलिस ठाण्यात सुमनबाई तुकाराम नलावडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कडा येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या शाखेत खाते आहे. तसेच बँकेत ए-४२ क्रमांकाचे लॉकर आहे. या लॉकरची चावी २००३ सालाच्या कालावधीत हरवली होती. त्यामुळे नलावडे यांनी याची माहिती तत्कालिन शाखा व्यवस्थापक यांना कळवली होती. तसेच लॉकर तोडण्याची विनंती त्यांच्याकडे केली होती. दरम्यानच्या कालावधीत औरंगाबाद येथील लॉकर तोडणारा आल्यावर तोडू, अहमदनगरचा लॉकर तोडणारा आल्यावर तोडू अशी उत्तरे वेळोवेळी दिली व लॉकर तोडणे टाळले. त्यानंतर बऱ्याच काळानंतर नलावडे यांच्या इमारतीचे काम काढल्याने त्यांना पैशाची गरज पडली. त्यावेळी त्यांनी पुन्हा लॉकरमधून पैसे काढण्याची विनंती केली. २४ जून रोजी सुमनबाई व त्यांचा मुलगा पांडुरंग यांच्याकडून बँकमॅनेजर यांनी विना पावतीचे लॉकर तोडण्यासाठी ३ हजार ८०० रुपये रोख घेतले व लॉकर तोडले. त्यावेळे लॉकरमधील पन्नास तोळे सोने व कागदपत्रे नसल्याचे अढळून आल्याने नलावडे यांना धक्का बसला. त्यामुळे सध्याचे मॅनेजर किशोर राजहंस यांनी दफ्तरची तपासणी केली असता दिसून आले की, २३ सप्टेंबर २००७ रोजी तत्कालीन शाखा अधिकारी याने कोणालातरी हाताशी धरुन बनावट चावी तयार करुन तिच्या अधारे रजिस्टरला इंग्रजी सही करुन सदरचे लॉकर उघडले असल्याचे समोर आले. या प्रकरणाची चौकशी करुन तत्कालीन मॅनेजर व इतर एक व्यक्ती यांची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी नलावडे यांनी आष्टीचे पोलिस निरिक्षक यांना केली आहे. या संदर्भात प्रतिक्रीया देताना स्टेट बँक आॅफ हैद्राबादचे शाखा व्यवस्थापक किशोर राजहंस म्हणाले की, आम्ही सदरील घटनेची माहिती वरिष्ठांना कळवू. बाकी इतर तपास पोलिस करतील. (वार्ताहर)