बंद घर फोडून रोख तीन लाखासह सोन्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 07:48 PM2020-10-29T19:48:31+5:302020-10-29T19:49:10+5:30
बजाजनगरातील जय भगवान सोसायटीत बंद घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला. यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी पाहणी करून श्वान पथकाच्या मदतीने चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच असून गावी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडल्याची घटना आज गुरुवार (दि.२९) सकाळी बजाजनगरात उघडकीस आली. या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी रोख ३ लाख रुपये व ७ ते ८ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे पुढे आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, छोटुलाल दादाजी हेमाडे हे पत्नी सविता मुली प्रतिक्षा, साक्षी व मुलगा हर्ष यांच्यासोबत बजाजनगरातील जय भगवान हौसिंग सोसायटीत वातव्यास आहेत. वडिलांचे वर्षश्राद्ध असल्यामुळे हेमाडे पती-पत्नी मुलांना घरी ठेऊन सोमवारी (दि.२६) नंदुरबारला गावी गेले होते. आई-वडील गावी गेल्यामुळे रात्री मुले घरी घाबरतील या भितीमुळे मामा प्रा. सचिन घुगे यांनी तीनही भाच्यांना सोबत घेऊन बजाजनगरात आपल्या घरी गेले होते. आज गुरुवारी (दि.२९) सकाळी हेमाडे यांच्या घराचे कुलुप तुटलेले व घरात कुणीही नसल्याचे शेजारी राहणाऱ्या देवकर यांच्या लक्षात आले. देवकर यांनी लागलीच हेमाडे यांच्याशी संपर्क करून याची माहिती दिली. यानंतर हेमाडे यांनी पत्नीचा भाऊ प्रा. सचिन घुगे यांना घरी जाऊन पाहणी करण्यास सांगितले. घुगे घरी आले असता त्यांना घरातील साहित्य अस्तव्यस्त पडलेले व कपाटातील काही वस्तुही गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यास दिली.
दागिने आणि रोकड लंपास
चोरट्यांनी बुधवारी रात्री कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यानंतर दोन्ही कपाटात ठेवलेले रोख ३ लाख रुपये आणि साडे तीन तोळ्याचे गंठन, तीन तोळे वजनाच्या पाच अंगठ्या, चैन, कर्णफुले असे जवळपास ७ ते ८ तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबविल्याचे समोर आले आहे. या चोरीची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे, उपनिरीक्षक राजेंद्र बांगर, सतीश पंडीत आदीच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
ठसे तज्ज्ञ व श्वानाकडून चोरट्याचा शोध
ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाने बजाजनगरात भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्वान ‘स्विटी’हिने चोरट्याचा माग काढत हेमाडे यांच्या घरा लगत असलेल्या बजाज विहारची संरक्षक भिंती ओलांडून सिडको वाळूजमहानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाऊन थांबली. दरम्यान, बजाज विहारातील भुखंडावर दारुच्या बाटल्याही पोलिसांना मिळून आल्या आहेत. चोरी केल्यानंतर चोरटे बजाज विहारातील भुखंडावरुन सिडकोमहानगरात पोहचल्यानंतर वाहनाने पसार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.