‘एटीएम’, ‘क्रेडिट’ कार्डपेक्षा पाकिटात आरोग्याचे गोल्डन, आभा कार्डच अधिक, पण वापर कधी?
By संतोष हिरेमठ | Updated: December 27, 2024 20:20 IST2024-12-27T20:20:30+5:302024-12-27T20:20:53+5:30
आरोग्याचे कार्ड कशासाठी? रुग्णालयात ‘गोल्डन कार्ड’, ‘आभा’ कार्ड कोण विचारतेय?

‘एटीएम’, ‘क्रेडिट’ कार्डपेक्षा पाकिटात आरोग्याचे गोल्डन, आभा कार्डच अधिक, पण वापर कधी?
छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्य नागरिकांच्या खिशात ‘एटीएम’ ‘क्रेडिट’ कार्डपेक्षा आरोग्य योजनांच्या कार्डची संख्या वाढली आहे. परंतु, या आरोग्य कार्डचा वापरच करता येत नसल्याची स्थिती आहे. रुग्णालयांमध्ये गेल्यानंतर आयुष्यमान योजनेचे ‘गोल्डन कार्ड’ आणि ‘आभा‘ कार्ड आहे का, अशी कुणाकडून साधी विचारणाही होत नाही. त्यामुळे कार्डचा उपयोग नेमका काय आहे, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत, यासाठी केंद्र शासनाकडून 'आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' राबविली जात आहे. योजनेसाठी नागरिकांना आयुष्यमान योजनेचे गोल्डन कार्ड देण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात. मात्र, आजघडीला ‘गोल्डन कार्ड’ची रुग्णालयात विचारणाच केली जात नसल्याची स्थिती आहे.
आरोग्याची कुंडली
आभा हेल्थ कार्ड ही एकप्रकारे रुग्णांच्या आरोग्याची कुंडली असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. कारण या कार्डमध्ये रुग्णाच्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाते. या कार्डच्या मदतीने डॉक्टर रुग्णाच्या संपूर्ण आरोग्याच्या माहिती मिळवू शकतात. म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज मिळवता येतो. परंतु, आजघडीला खासगी रुग्णालयांत या कार्डची विचारणाच होत नसल्याची परिस्थिती आहे.
कार्ड नाही, पण ॲपवर नोंदणी
जिल्हा सामान्य रुग्णालयातही आभा कार्ड आहे का, अशी कुणाकडून विचारणा होत नाही. परंतु, रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच ‘आभा‘ ॲपच्या मदतीने ओपीडीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे आभा कार्ड नाही, अशांनाही या ॲपच्या मदतीने ऑनलाइन पद्धतीने ओपीडीसाठी नोंदणी करता येत आहे. या ॲपवरच डाॅक्टरांनी दिलेली औषधीही पाहता येतात.
आरोग्य विभागाच्या रुग्णालयांपुरतेच मर्यादित
आभा कार्ड हे फक्त सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या रुग्णालयांपुरतेच मर्यादित राहात आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या घाटी रुग्णालयातही या कार्डची विचारणा होत नाही.
पुढच्या टप्प्यात खासगी रुग्णालयांत वापर
सध्या आभा कार्डचा वापर हा केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये होत आहे. त्यातून रुग्णांच्या आजाराची माहिती, घेतलेला उपचार आदींची माहिती मिळते. पुढच्या टप्प्यात खासगी रुग्णालयांतही आभा कार्डचा वापर होईल, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.