स्वातंत्र्यपूर्व काळापासून उर्दूचा सुवर्णकाळ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:03 AM2021-07-12T04:03:57+5:302021-07-12T04:03:57+5:30
उर्दू साहित्यात मोठे योगदान असलेले आणि अनेक पुरस्कारप्राप्त व्यक्तिमत्त्व म्हणजे अस्लम मिर्झा. अदबच्या जगात अत्यंत आदराने त्यांचे नाव घेतले ...
उर्दू साहित्यात मोठे योगदान असलेले आणि अनेक पुरस्कारप्राप्त व्यक्तिमत्त्व म्हणजे अस्लम मिर्झा. अदबच्या जगात अत्यंत आदराने त्यांचे नाव घेतले जाते. ‘उर्दू साहित्यात औरंगाबादचे स्थान’या विषयावर त्यांनी ‘लोकमत’समोर मांडलेला इतिहास.
अस्लम मिर्झा- ज्येष्ठ साहित्यिक
औरंगाबाद : मराठवाड्यातील ‘दकनी’ उर्दू भाषेला ७०० वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. अनेक भाषांच्या मिश्रणातून ही गोड भाषा जन्माला आली. काही राज्यकर्त्यांनी उर्दूला राजभाषेचा दर्जा दिला तर काहींना दिला नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून खरा सुवर्णकाळ पाहायला मिळतो. मोठमोठे लेखक, कवी, शायर १८ व्या शतकात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. औरंगाबाद शहर पूर्वीही उर्दूच्या चळवळीचा केंद्रबिंदू होते आणि आजही आहे.
मराठवाडा ज्याला इतिहासात आजही ‘दक्कन’ म्हटले जाते. सुफी, संत, राज्यकर्ते, व्यापारी अनेकांना हा परिसर खूपच आवडत होता. अलाऊद्दीन खिलजीने सर्वत्र आपली पाळेमुळे रोवायला सुरुवात केली. इ.स. १३०० च्या आसपासचा हा विषय. त्याच्यासोबत दिल्लीचे सैनिकही असत. मराठवाड्यात अरब व्यापाराच्या निमित्ताने, तर वेगवेगळ्या भाषा बोलणारे सैनिक येत. दैनंदिन व्यवहारात शब्दांचे आदानप्रदान होत होते. याच कालखंडात उर्दूने बारसे धरले. १३२७ मध्ये मोहमद तुघलकाने आपली राजधानी दौलताबाद येथे आणली. त्याच्यासोबत हजारो सैनिक आले. हरयानवी, पंजाबी, खडी बोली, बुंदेली, पारसी, तुर्की अशा कितीतरी भाषा बोलणारे बाशिंदे आले. याच कालखंडात बुजुर्ग औलीया ‘तब्लिग’च्या प्रचार-प्रसारासाठी आले. त्यांनीही नागरिकांच्या दैनंदिन भाषेचा आधार घेत आपले म्हणणे नागरिकांसमोर ठेवले. यानंतर ‘बहामणी’ कालखंड पहायला मिळतो. साधारण १५० वर्षे हा कालखंड होता. या काळात उर्दूचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळाला. या भाषेला राजाश्रयही मिळाला. पुढे मुगल राज्यकर्ते जहांगीर, शहाजहान यांनी दक्कनवर अतिक्रमणे सुरू केली. १६०५ मध्ये मलीक अंबरच्या फतेहनगरला (औरंगाबाद) मुगलांनी फतेह केले. औरंगजेबला सुभेदार म्हणून नेमले. तब्बल ८ वर्षे औरंगजेब औरंगाबादेत राहिले. मुगल सैनिकांमुळे उर्दू भाषा अधिक गोड होत गेली. आणखी थोडे पुढे गेल्यावर १९४२ पासून उर्दूचा सुवर्णकाळ पहायला मिळतो. वली औरंगाबादी, सिराज औरंगाबादी असे मोठे शायर उदयाला आले. निझाम राजवटीने हैदराबादला राजधानी नेली. त्या काळात उर्दूला राजाश्रय मिळाला नाही. उस्मानिया विद्यापीठाचे इंटरमिजिएट महाविद्यालय मौलवी अब्दुल हक्क यांनी सुरू केले. त्यामुळे सिकंदर अली वज्द, हिमायत अली, जे. पी. सईद, काझी सलीम, बशर नवाज, सहेर जैदी अशी कितीतरी विश्वविख्यात मंडळी नावारूपाला आली. कोणत्याही भाषेला राजाश्रय मिळाल्याशिवाय ती मोठी होऊ शकत नाही, हे इतिहासावरून सिद्ध होते.