औरंगाबादच्या साक्षीची गोल्डन कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:33 AM2018-02-23T00:33:38+5:302018-02-23T00:34:03+5:30
औरंगाबादची प्रतिभावान अॅथलिट साक्षी चव्हाण हिने जबरदस्त कामगिरी करीत नवी दिल्ली येथे झालेल्या गेल इंडियातर्फे ‘इंडियन स्पीड स्टार’अंतर्गत अॅथलेटिक्स स्पर्धेत पदकांचा डबल धमाका केला. या स्पर्धेत साक्षी चव्हाण हिने मुलींच्या १४ वर्षांखालील वयोगटात २00 मीटर धावण्याच्या शर्यतीत २६ सेकंदांची वेळ नोंदवीत सुवर्णपदक जिंकले.
औरंगाबाद : औरंगाबादची प्रतिभावान अॅथलिट साक्षी चव्हाण हिने जबरदस्त कामगिरी करीत नवी दिल्ली येथे झालेल्या गेल इंडियातर्फे ‘इंडियन स्पीड स्टार’अंतर्गत अॅथलेटिक्स स्पर्धेत पदकांचा डबल धमाका केला.
या स्पर्धेत साक्षी चव्हाण हिने मुलींच्या १४ वर्षांखालील वयोगटात २00 मीटर धावण्याच्या शर्यतीत २६ सेकंदांची वेळ नोंदवीत सुवर्णपदक जिंकले. त्याचप्रमाणे तिने १00 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. तिने १२.0७ सेकंदांत हे अंतर पूर्ण केले. साक्षीला भारताचे आॅलिम्पिक पदकविजेते आणि केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे २0२0 आणि २0२४ आॅलिम्पिकसाठी गेल इंडियातर्फे पूर्ण देशभरात १४ व १६ वर्षांखालील प्रतिभावान खेळाडूंची शोधमोहीम योजनेंतर्गत २९ राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशातील एकूण दीड लाख खेळाडूंची चाचणी घेण्यात आली होती आणि या चाचणीतून १४ व १६ वर्षांखालील १00 मी., २00 मी. व ४00 मी.साठी प्रत्येक गटातील देशभरातून निवडक फक्त २४ खेळाडू निवडण्यात आले होते. त्याअंतर्गत महाराष्ट्रात नागपूर, नांदेड आणि पुणे येथे या सिलेक्शन ट्रायल झाल्या होत्या. त्यात औरंगाबादच्या साक्षी चव्हाण हिची निवड झाली. साक्षीने आपली निवड सार्थ ठरवत दोन पदकांची लूट करीत आपला विशेष ठसा उमटवला.
याआधी रत्नागिरी येथे याचवर्षी १२ जानेवारीला झालेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतही साक्षी चव्हाण हिने मुलींच्या १४ वर्षांखालील वयोगटात २00 मीटर धावण्याची शर्यत २५.८ सेकंदांत जिंकत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच १00 मीटर धावण्याच्या शर्यतीत तिने रौप्यपदकाची कमाई केली होती. याच स्पर्धेत ४ बाय १०० मीटर रिलेत तिने ४६.८ सेकंदांची वेळ नोंदवीत महाराष्ट्राला कास्यपदक जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले. साक्षी चव्हाण हिने गतवर्षी नागपूर येथील राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत २०० मीटरला सुवर्ण आणि १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. तसेच त्याचवर्षी तिने पुणे येथील सबज्युनिअर स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली होती. सातारा परिसरातील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकत असणारी साक्षी चव्हाण ही क्रीडा प्रबोधिनीची विद्यार्थिनी असून, गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर प्रशिक्षक सुरेंद्र मोदी आणि प्रशिक्षिका पूनम नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. या कामगिरीबद्दल तिचे क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांनी अभिनंदन केले आहे.