रस्त्यासाठी २० एकरच्या तडजोडीचे गौडबंगाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:27 AM2018-01-03T00:27:09+5:302018-01-03T00:27:24+5:30
क्षेत्रफळाने महाराष्ट्रात सर्वात मोठ्या असलेल्या जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीने संचालक मंडळाच्या बैठकीत अजब प्रस्ताव दाखल केला आहे.
प्रशांत तेलवाडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : क्षेत्रफळाने महाराष्ट्रात सर्वात मोठ्या असलेल्या जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीने संचालक मंडळाच्या बैठकीत अजब प्रस्ताव दाखल केला आहे. तडजोडीच्या नावाखाली अवघ्या १५ मीटरच्या मुख्य रस्त्यासाठी जळगाव रोडलगतची २० एकर जागा बिल्डर्सच्या घशात घालण्याचा ठराव मांडण्यात आला आहे. या जमिनीची किंमत सुमारे ४०० कोटींपेक्षा अधिक आहे. उल्लेखनीय, म्हणजे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही कृउबातर्फे तडजोडीचा खटाटोप केला जात आहे. या तोडजोडीपाठीमागील ‘गौडबंगाल’ काही वेगळेच आहे, याची चर्चा जाधववाडी, मोंढ्यात चर्चिली जात आहे.
औरंगाबाद तालुका बाजार समितीची जाधववाडीत १७५ एकर जागा आहे. मात्र, त्यातील सर्व्हेनंबर १२ येथील ३ हेक्टर व सर्व्हेनंबर १३ येथील ४ हेक्टर ८५ आर (२० एकर) जागा (पार्श्वनाथ रियाल्टी प्रा.लि) या खाजगी बिल्डर्सच्या ताब्यात आहे. ही जागा बाजार समितीला परत मिळावी यासाठी मागील २५ वर्षांपासून न्यायालयात लढाई सुरूआहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मध्यंतरीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरात व तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमसिंग यांनी त्या जागेच्या संदर्भात खाजगी बिल्डर्सच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर बाजार समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आॅगस्ट २०१६ मध्ये बाजार समितीला त्या जागेसंदर्भात स्टे मिळाला होता. सध्या बाजार समितीवर भारतीय जनता पार्टीचे ‘राज्य’ आहे. सर्व्हेनंबर १२ व १३ मधून मुख्य रस्त्यासाठी जागा मिळाली, तर जळगाव रोडवरून थेट जाधववाडीत येता येईल, अशी चर्चा कृउबा समितीमध्ये सुरू झाली. यातूनच बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी तातडीची बैठक २८ डिसेंबर रोजी बोलावली होती. यात २० एकर जागेसंदर्भात तडजोडीबाबतचा एका ओळीत उल्लेख करण्यात आला होता. या बैठकीत संचालकांना सांगण्यात आले की, सर्व्हेनंबर १२ व १३ मधील २० एकर जागेमधून १५ मीटरचा मुख्य रस्ता तयार करून देण्याचे पार्श्वनाथ रियाल्टी प्रा.लि. मान्य केले आहे. त्यात रस्ता तयार करून देणे पथदिवे लावणे, सुरक्षा रक्षकासाठी केबिन तयार करून देण्याचा समावेश आहे.
त्या बदल्यात उर्वरित जागा बिल्डर्स व्यावसायिक वापर करणार आहे. त्यावर बाजार समितीचा हक्क राहणार नाही, असे प्रस्तावात नमूद आहे, अशी तडजोडीची भूमिका सभापतींनी घेतली. यास बाजार समितीतील महानगरपालिकेचे प्रतिनिधी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी कडाडून विरोध केला. त्यांनी या प्रस्तावावर आक्षेप नोंदवत प्रकरण न्यायालयात असल्याने कोणतेही पाऊल बाजार समितीने उचलू नये, असे स्पष्ट सांगितले.
बाजार समितीच्या सभापती व अन्य संचालकांची मात्र, या प्रस्तावाला संमती दिसते. माझ्याशिवाय कोणीच प्रस्तावाला विरोध केला नसल्याचे तुपे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. या बैठकीनंतर ‘तडजोडीच्या गौडबंगाला’ची चर्चा जाधववाडी व मोंढ्यातील व्यापारी वर्गात सुरूआहे.
पालकमंत्र्यांना निवेदन
बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब कोळगे पाटील व माजी महापौर त्र्यंबक तुपे व अडत व्यापारी हरीश पवार यांनी मंगळवारी सकाळी पालकमंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तडजोडीच्या प्रस्तावाआड बाजार समितीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.
ठराव तिजोरीत ठेवून सचिव केरळला
१५ मीटर रस्त्यासाठी २० एकर जागेवर पाणी सोडण्याचा अजब ठराव कृउबाने २८ डिसेंबरच्या बैठकीत मांडला होता. त्या ठरावाचा अहवाल तिजोरीत ठेवून बाजार समितीचे सचिव विजय शिरसाट हे उपचारासाठी केरळला निघून गेले. तुपे यांनी लेखी स्वरूपात बाजार समितीला ठरावची प्रत मागितली. तसेच आमच्या प्रतिनिधीनेही ती प्रत मागितली; पण तिजोरीला कुलूप लावून सचिव केरळला गेल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. तडजोडीचा ठराव मंजूर झाला की नाही हे पडद्यामागील रहस्य उलगडू शकले नाही.
न्यायालयात प्रकरण असताना तडजोड कशाला
सर्व्हेनंबर १२ व १३ च्या २० एकर जागेचे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, न्यायालयात आपल्या बाजूने निकाल लागणार नाही. असेच कृउबाचे सभापती व सचिवांनी बैठकीत जाहीर केले. यामुळे तडजोड करून रस्त्यासाठी तरी जागा पदरात पाडून घेऊ, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, मी यास विरोध केला जर अशी परिस्थिती असेल तर सर्वोच्च न्यायालयाने त्या जागेसंदर्भात ‘जैसे थे परिस्थिती’चा आदेश दिलाच नसता, यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसारच जागेचा निर्णय होईल, असे मी स्पष्ट सांगितले.
-त्र्यंबक तुपे,
माजी महापौर, कृउबातील मनपा प्रतिनिधी