कामगार कल्याण मंडळाला येणार अच्छे दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 08:42 PM2018-12-21T20:42:45+5:302018-12-21T20:54:33+5:30
कामगार कल्याण मंडळाच्या अंशदान निधीत वाढ करण्याबरोबरच थकित अंशदान निधीही दिला जाईल, असे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे.
वाळूज महानगर : कामगार कल्याण मंडळाच्या अंशदान निधीत वाढ करण्याबरोबरच थकित अंशदान निधीही दिला जाईल, असे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच कामगार कल्याण मंडळाला अच्छे दिन येणार असून, कामगारांनाही त्याचा लाभ मिळणार आहे.
२००३ पासून कामगार मंडळाला वाढीव निधी व अंशदान निधी मिळालेला नाही. मिळणाऱ्या अल्प उत्पन्नातून कामगार मंडळाला कामगारांसाठी असलेल्या विविध योजना राबविणे तसेच कर्मचाºयांचे वेतन करणे अवघड होत आहे. याचा विपरित परिणाम कामगारांच्या योजनांवर पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटना संलग्न भारतीय बहुजन कामगार संघाने ११ डिसेंबर रोजी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले होते.
त्यानंतर मुंबई येथे कामगार मंत्र्याबरोबर १७ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत संघटनेच्या संजय केणेकर, नितिन निंभोरकर, संदीप कुलकणी, शिवाजी वाघ, संग्राम साने, व श्यामकांत पाटील यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्या यावेळी मांडल्या. मंडळाच्या अंशदान निधीत वाढीचा अध्यादेश लवकरच काढण्याचे आश्वासन कामगार मंत्री निलंगेकर यांनी दिल्याची माहिती कामगार कल्याण भवनचे केंद्र प्रमुख दिनकर पाटील यांनी दिली.