गंगापूर तालुक्यात वाळूमाफियांना ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:34 AM2019-01-15T00:34:42+5:302019-01-15T00:35:10+5:30
तालुक्यातील धामोरी -शेंदुरवादा परिसरात मातीमिश्रित वाळूची सर्रास लूट केली जात असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगापूर : तालुक्यातील धामोरी -शेंदुरवादा परिसरात मातीमिश्रित वाळूची सर्रास लूट केली जात असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.
नाममात्र मातीमिश्रीत वाळू परवानगीच्या नावाखाली शेकडो हायवा ट्रक परवानगीपेक्षा जास्त वाळू भरून वाहतूक करीत आहेत. या वाहनांमुळे रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. प्रशासनातर्फे मातीमिश्रीत वाळूचा ५०० ब्रास वाळूचा ठेका देण्यात आला होता. असाच प्रकार पेंडापूर शिवारातही झाला होता. वाळू माफिया व महसूल विभागाच्या या ‘सोयरिकी’मुळे हजारो ब्रास वाळू उपसा करून नदी पात्रात मोठमोठे खड्डे केले आहेत. यामुळे शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
विशेष म्हणजे अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान घरकुल योजनेसाठी लाभधारकांना घर बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू देण्याची घोषणा केली आहे, या घोषणेमुळे वाळूमाफियांचे चांगले फावले आहे. तालुक्यातील खांब नदीवरील शेंदूरवादा तर शिवना नदीवरील काटेपिंपळगाव, कोबापूर, वाघलगाव, झोडगाव, भालगाव, पेंडापूर, कनकोरी, बोलेगाव, पुरी, पाखोरा, नंद्राबाद या ठिकाणी पाण्याविना उघड्या पडलेल्या नदीपात्रातून जेसीबीच्या साह्याने उत्खनन करून हजारो ब्रास वाळू सर्रास वाहतूक केली जात आहे. गोदावरी नदीचे पाणी आता कमी झाले आहे. त्यामुळे नेवरगाव परिसरातील संकटेश्वर मंदिर या ठिकाणी वाळू तस्करांनी आपला मोर्चा वळविला आहे. कुंपणच शेत खात असल्याने तक्रार तरी करावी कोणाकडे, अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे.