रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेणखताला ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:04 AM2021-03-07T04:04:41+5:302021-03-07T04:04:41+5:30
लोकमत न्यज नेटवर्क आळंद : रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमतीत वाढ केल्याने शेतकरी पुन्हा एकदा शेणखताकडे वळू लागला ...
लोकमत न्यज नेटवर्क
आळंद : रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमतीत वाढ केल्याने शेतकरी पुन्हा एकदा शेणखताकडे वळू लागला आहे. त्यामुळे शेणखताला पुन्हा ‘अच्छे दिन’ आले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मात्र, असे असले तरीही ग्रामीण भागात जनावरांची संख्या कमी झालेली असल्याने मागणीच्या प्रमाणात शेणखत उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर शेणखत मिळवणे हे मोठे आव्हानच असेल.
पूर्वी शेती-मशागतीची कामे बैलांच्या सहाय्याने केली जात. त्याचबरोबर शेतकरी दुग्ध उत्पादनासाठी गाय व म्हशींचा सांभाळ करत असल्याने गावांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे सहा ते दहा जनावरे असत. त्यामुळे शेतीसाठी मुबलक प्रमाणात शेणखतही उपलब्ध होत असे. कालांतराने शेतीकाम आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने केले जाऊ लागले. त्यामुळे पशुधनाची संख्या घटली आणि शेणखताची निर्मिती थांबली तर दुसरीकडे भरघोस उत्पादन घेण्याच्या नादात शेतकरी रासायनिक खतांकडे वळला. त्यामुळे उत्पादन वाढले असले तरी जमिनीचा पोत मात्र बिघडला. त्यात रासायनिक खतांच्या वाढत्या दरामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल होऊ लागला आहे. याचवेळी फुलंब्री तालुक्यातील ऊमरावती येथील निवृत्त पोलीस उपआयुक्त कल्याणकुमार लवंगे, गणेश खमाट, जातवा येथील आण्णा पवार यांच्यासारखे प्रगतशील शेतकरी शेणखताचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत आहेत.
-----
बॅगमागे १५० ते २५० रुपयांची वाढ
दिनांक १ मार्चपासून खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या दरात पन्नास किलोच्या बॅगमागे १५० ते २५० रूपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. शेतकरी आता शेणखताचा शोध घेऊ लागले आहेत. ज्यांच्याकडे जनावरे आहेत, अशा शेतकऱ्यांकडे शेणखताची विचारणा केली जात आहे.
शेणखताचा असा आहे दर
तीन हजार ते साडेतीन हजार रूपये प्रतिट्रॅक्टर प्रमाणे शेणखताची विक्री केली जात आहे. एका ट्रक्टरच्या ट्रीपमध्ये ओले शेणखत दोन टन बसते तर वाळलेले शेणखत दीड टन बसते. त्याची प्रतिकिलो दोन ते तीन रुपये भावाने विक्री होत आहे.
रासायनिक खताचे भाव
प्रकार पूर्वीचे दर नवीन दर
डी ए पी : १,२०० १,४५०
२०:२०:०:१३ ९५० १,१२५
१०:२६:२६ १,१८५ १,३८५
१२:३२:१६ १,२०० १,३७५
१५:१५:१५ १,०४० १,२००
१४:३५:१४ १,२७५ १,५००
रासायनिक खत साधारणपणे प्रतिकिलो २० ते ३० रुपये किलोने विक्री होते.
------
शेतकरी म्हणतात...
माझ्याकडे दहा एकर जमीन असून, त्यात पपई, आंबे, टरबूज, झेंडूचे उत्पादन घेतो. या पिकांसाठी मी सेंद्रिय खतांचा वापर करतो. त्यामुळे फळांची गुणवत्ता व दर्जा मिळत असल्याने बाजारपेठेत चांगली किंमत मिळते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांपेक्षा शेणखताचा वापर करावा. - आण्णा हरिबा पवार, शेतकरी, जातवा.
माझ्याकडे सहा एकर जमीन असून, दुग्ध उत्पादनासाठी गायी पाळतो. त्यामुळे भरपूर दूध उत्पादन होऊन कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागतो. शिवाय शेणखतही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने रासायनिक खताचा वापर अल्प प्रमाणात होतो. शेणखतामुळे चांगले उत्पन्न मिळत असून, यावर्षी मी एकरी तीनशे क्विंटल आल्याचे उत्पन्न घेतले.
- गणेश खमाट, शेतकरी, ऊमरावती
--------
फोटो ओळ : जातवा (ता. फुलंब्री) येथील शेतकरी आण्णा हरिबा पवार हे कंपोस्ट खत व शेणखत तयार करुन शेतीसाठी वापरतात. दुसऱ्या छायाचित्रात शेतकरी आण्णासाहेब पवार यांच्या शेतातील फळबाग.