‘पोथीशाळे’ला चांगले दिवस

By Admin | Published: August 27, 2014 12:02 AM2014-08-27T00:02:58+5:302014-08-27T00:15:29+5:30

विजय सरवदे, औरंगाबाद अडगळीत पडलेली पोथीशाळा वर्षभरापूर्वी तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी ग्रंथालयातील स्वतंत्र दालनात स्थलांतरित केली.

Good days for 'Potheesale' | ‘पोथीशाळे’ला चांगले दिवस

‘पोथीशाळे’ला चांगले दिवस

googlenewsNext

विजय सरवदे, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात अडगळीत पडलेली पोथीशाळा वर्षभरापूर्वी तत्कालीन कुलगुरूडॉ. विजय पांढरीपांडे यांनी ग्रंथालयातील स्वतंत्र दालनात स्थलांतरित केली. त्या पोथीशाळेला आता कुठे चांगले दिवस आले असून, या पोथीशाळेमुळे विद्यापीठाचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे.
भारतातील कोणत्याही विद्यापीठातील मराठी विभागात नसलेला हजारो हस्तलिखितांचा हा एवढा मोठा संग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन मराठी विभागप्रमुख वा. ल. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यु. म. पठाण यांनी अतिशय कठीण परिश्रमातून जमा केला. १९६० ते १९९० या तीन दशकांत मराठवाड्यातील शेकडो गावांमध्ये जाऊन डॉ. पठाण व त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी ही हस्तलिखिते जमा केली. जवळपास ६ हजार पोथ्या जमा झाल्या. यामध्ये वीरशैव धर्म, जैन धर्माचे दुर्लक्षित साहित्य, सुफी, मराठी संत व महानुभाव पंथाच्या अनेक पोथ्यांचा समावेश आहे. मराठी विभागात उभारण्यात आलेली ही एकमेव पोथीशाळा आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून या दुर्मिळ ठेव्याकडे एकाही विभागप्रमुखाने लक्ष न दिल्याने या पोथीशाळेची वाताहत झाली.
विद्यापीठाचे तत्कालीन मराठी विभागप्रमुख व नंतर कुलगुरूअसलेले डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सदरील पोथीशाळेचे जतन करण्यासाठी तिला ग्रंथालयात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक समिती नेमली. डॉ. कोत्तापल्ले सेवानिवृत्त झाले. त्यानंतर दोन वर्षांनी माजी कुलगुरू डॉ. पांढरीपांडे यांनी पुढाकार घेऊन मे २०१३ मध्ये सदरील पोथीशाळेचे स्थलांतर ग्रंथालयाच्या पहिल्या मजल्यावरील एका सुसज्ज दालनात केले. शास्त्रीयदृष्ट्या प्रक्रिया करून या पोथीशाळेचा दुर्मिळ ठेवा आज सुरक्षितपणे संशोधकांना पाहायला, हाताळायला व संदर्भासाठी मिळत आहे. बहुतांश पोथ्या या मोडी लिपीत आहेत. याशिवाय अनेक पौराणिक वस्तूही या पोथीशाळेत पाहायला मिळतात.
२५ विद्यार्थ्यांचे संशोधन
पोथीशाळेच्या आठवणी सांगताना डॉ. यु. म. पठाण म्हणाले की, या पोथीशाळेमुळे आपल्या विद्यापीठाचे नाव देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर पोहोचले आहे.
माझ्या मार्गदर्शनाखाली जवळपास २५ विद्यार्थ्यांनी या पोथीशाळेवर संशोधन केले आहे. रशिया, फ्रान्स, पश्चिम जर्मनी, लंडन, झेकोस्लोवाकिया आदी देशांतील शेकडो अभ्यासकांनी पोथीशाळेला भेटी दिल्या आहेत.
बहुतांश पोथ्या ७०० वर्षे जुन्या आहेत. यात भूर्जपत्रावरची भगवतगीता, स्तोत्रे, अभंग, गाथा, एकनाथी भागवत, दत्तोपंतांची पासोडी अशा अनेक हस्तलिखित पोथ्या आहेत.

Web Title: Good days for 'Potheesale'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.