हवे सुशासन ! महापालिकेच्या कारभाराला जनतेकडून ५ गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 06:18 PM2020-02-25T18:18:54+5:302020-02-25T18:20:35+5:30
कार्यक्षम व प्रभावी प्रशासनासह सक्षम सार्वजनिक सेवा मिळाव्यात अशी शहरवासीयांची अपेक्षा
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : लोकशाही राज्यकारभारात कार्यक्षम व प्रभावी प्रशासनाची हमी देणे म्हणजे सुशासन होय. नि:पक्षपातीपणा, कायद्याचे राज्य ही सुशासनाची वैशिष्ट्ये मानली जातात. तर सक्षम सार्वजनिक सेवा, उत्तरदायी निर्णय व्यवस्था, ही सुशासनाकडून अपेक्षा आहे. मात्र, याउलट परिस्थिती औरंगाबाद महापालिकेची पाहायला मिळते. राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे वर्षानुवर्षे त्याच त्या समस्यांना शहरवासीयांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेत सुशासन हवे, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
मनपा प्रशासनाने काही निर्णय घेतला तर त्यास सत्ताधाऱ्यांकडून विरोध होत असल्याचे पाहायला मिळते. तर सत्ताधाऱ्यांनी काही निर्णय घेतल्यास त्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून विरोध आणि मूक संमती, अशी परिस्थिती पाहायला मिळते. या सगळ्यात लोकप्रतिनिधी शहराऐवजी स्वत:चा विकास करण्यावरच भर देत असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. गेल्या पाच वर्षांत पाणी, रस्ते, कचरा यासारख्या मूलभूत सुविधांमधील गैरसोयी दूर झालेल्या नाहीत. महापालिकेत समावेश होऊनही सातारा-देवळाईकरांना पाण्यासह सोयी-सुविधांची प्रतीक्षा करावी लागत आहे. महापालिकेत सुशासन नसल्यामुळे शहराची ही अवस्था झाली आहे. त्यामुळे विकासकामे होणार कशी, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या कारभारात लोकप्रतिनिधींबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत प्रशासकीय कारभारात सर्वाधिक आयुक्त बदलून गेले. आयुक्त आणि प्रभारी आयुक्त असे ७ अधिकारी बदलून गेले. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या राजकारणात तत्कालीन मनपा आयुक्तांवर अविश्वास ठराव आणला गेला. पालिकेतील राजकीय गदारोळात प्रभारी आयुक्तांचीही बदली. अवघ्या काही कालावधीत आयुक्त, प्रभारी आयुक्तांची बदली होत गेली. या सगळ्यात कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कचराप्रश्नी सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांवर ठपका ठेवला होता.
या सगळ्यात कचऱ्याचा प्रश्न सुटण्यासाठी नागरिकांना अनेक महिने वाट पाहावी लागली. प्रशासकीय अधिकारी नागरिकांशी संवाद साधत नाहीत. नागरिकांच्या समस्या जाणून घेत नाहीत. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी फक्त आश्वासन देऊन मोकळे होतात. ही परिस्थिती दूर व्हावी आणि मुंबई, पुण्याच्या धर्तीवर शहराची प्रगती व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
डिसेंबर २०१९ मध्ये महापालिका आयुक्तपदी आस्तिककुमार पाण्डेय रुजू झाले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महापालिके बरोबर शहराची परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. परंतु आगामी कालावधीत नव्याने येणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही शहराच्या विकासाला हातभार लावण्याची अपेक्षाही शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.
महापालिकेची मानसिकता बदलावी
रस्त्यांची कामे काही प्रमाणात ठीक झाली आहेत. त्यामुळे मनपाला ६ गुण देता येतील. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्याचे काम झाले. परंतु अंतर्गत रस्त्यांची कामे झालेली नाहीत. स्वच्छतेचे काम समाधानकारक होत नाही. पाणीपुरवठा होतो; परंतु पुरेसा प्रमाणात होत नाही. चांगला पाऊस पडूनही पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिकांना दररोज पाणी मिळण्याची गरज आहे. पथदिव्यांची अवस्था वाईट आहे. मनपाचे काम समाधानकारक नाही. शहराच्या विकासाचा विचार करताना समाधानकारक बाब नाही. अनेक गोष्टी होणे बाकी आहेत. स्मार्ट सिटीकडे वाटचाल नाही. परंतु त्यादृष्टीने मनपाची मानसिकताच नाही. मनपा प्रशासनाने मानसिकता बदलली पाहिजे. स्वत:चा विचार सोडून नागरिकांचा विचार केला पाहिजे.
- मनीष गुप्ता, उद्योजक
सत्ताधारी, विरोधक जबाबदार
मनपा प्रशासनाला १० पैकी केवळ ५ गुण देऊ वाटतात. आर्थिक अडचणीत असताना मनपा चालविली, यासाठीच हे गुण आहेत. वसुलीच्या परिस्थितीला तेच जबाबदार आहे. अनेक कामे झाली नाहीत. जे रस्ते केले आहेत, तेही चुकीच्या पद्धतीनेच केले आहेत. रस्त्यांची उंची वाढविण्यात येऊ नये, अशी वारंवार मागणी करण्यात आली. जुन्या शहरात जलवाहिनीचे काम होईपर्यंत सिमेंट रस्ते करण्यात येऊ नयेत, अशी मागणी असताना ते केले. परिणामी, दुकाने खाली आणि रस्ते वर झाले आहेत. शहराच्या परिस्थितीला सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही जबाबदार आहेत. मनपा आयुक्त चांगले आले आहेत. परंतु खालचे अधिकारीच बरोबर नाहीत. कामाच्या फायली मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. पाण्याचीही समस्या आहे. अनेक वर्षे मनपात असून शहरातील प्रश्न सुटलेला नाही.
- लक्ष्मीनारायण राठी, व्यापारी
विकासासाठी पुढाकार घ्यावा
शहरात पाण्याचा प्रश्न आहे. कधी पाच, तर कधी सहा दिवसाला पाणी येते. यात सर्वात जास्त पाणीपट्टी आपल्याकडे आहे. मुंबई, पुण्याच्या तुलनेत सर्वाधिक पाणीपट्टी आकारली जाते. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातील नागरिकांनी मोर्चा काढावा, असे वाटते. शहरातील नागरिक त्रस्त असून, मनपाविषयी नाराजी व्यक्त केली जाते. काही प्रमाणात विकास झाला. परंतु पाणी, उद्यानांची अवस्था वाईट आहे. अनेक ठिकाणी रस्ते खराब आहेत. जागोजागी खड्डे आहेत. खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनाही होण्यास हातभार लागतो. वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. यामुळे मनपाला जास्तीत जास्त ४ गुण देता येतील. शहरातील ही परिस्थिती सुधारली पाहिजे. शहराचा विकासासाठी प्राधान्याने पुढाकार घेतला पाहिजे.
-अरुण पिंपळे, नागरिक
राजकारणापेक्षा सुविधांकडे लक्ष द्यावे
शहराचा विकास, पायाभूत सुविधांचा विचार क रता मनपा प्रशासनाला ५ गुण देता येतील. शहराचा विकास खुंटला आहे. पूर्वीच्या तुलनेत आता विकास होत नाही. अधोगती होतानाच दिसते. रस्त्यांची अवस्था वाईट आहे. मुख्य रस्त्यांच्या कामांवर भर दिला जात आहे. अंतर्गत रस्त्यांची अवस्था सुधारलेली नाही. ज्या प्रमाणात विकासकामे झाली पाहिजे, ती कामे मनपाकडून झालेली नाहीत. याचा मनपा प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे. पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होतो. कचऱ्याचा प्रश्न ८० टक्के सुटला आहे. त्यात आणखी सुधारणा होण्याची गरज आहे. राजकारण करण्यापेक्षा मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन कामे करण्याची गरज आहे.
- अॅड. संगीता एच. देसरडा
राजकारणी, प्रशासनाची युती
पाणीपुरवठा, आरोग्य, शाळांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे एखादा गुण मनपाला देता येईल. मनपा प्रशासनाकडून नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. राजकारणी आणि प्रशासन यांची युती दिसते. त्यामुळे मनपाला उत्पन्न मिळत नाही. त्यातून विकासकामे होत नाहीत. मनपाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची गरज आहे. उत्पन्न वाढविण्याची गरज आहे. मनपा आयुक्तांनी कर कमी केले पाहिजे. त्यातूनच वसुली अधिक होईल. सुशासनासाठी आयुक्त प्रयत्न करीत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. मनपाच्या काही अडचणीही आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचारी नाहीत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण येतो. ही सर्व परिस्थिती दूर झाली पाहिजे, तरच चांगल्या सुविधा मिळू शकतील.
- अॅड. अभय टाकसाळ, भाकप
या समस्यांमुळे कमी गुण
महापालिकेने कचऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात निकाली काढला आहे. अद्यापही ही समस्या पूर्णपणे सुटलेली नाही.
अनेक भागांत पाच, सहा दिवसांआड पाणीपुरवठा होतो. सातारा-देवळाईसह अनेक भागांत पाण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
शहरातील विविध भागांमध्ये अंतर्गत रस्त्यांची अवस्था वाईट आहे. बाजारपेठेत वाहन उभे करण्यासाठी पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे महापालिकेला कमी गुण देत असल्याचे शहरवासीयांनी सांगितले.
महापालिकेला १० पैकी किती गुण देणार, असा सवाल ‘लोकमत’ने उद्योजक, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक, महिला, सामाजिक कार्यकर्त्यांना केला. तेव्हा मनपाला ५ गुण देण्यावर अनेकांचा भर होता. शहरातील अनेक प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे काहींनी केवळ १ गुण दिला. महापालिकेच्या कारभाराविषयी आणि शहराचा खुंटलेला विकास, यामुळे नागरिकांनी मनपाच्या कारभाराविषयी संतापही व्यक्त केला.