खुशखबर ! सातव्या वेतन आयोगानुसार पोलिसांना मिळणार पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 04:49 PM2019-04-06T16:49:59+5:302019-04-06T16:50:30+5:30
वेतन सातव्या वेतन आयोगानुसार देण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून तयारी सुरू आहे.
औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत सुमारे साडेतीन हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना एप्रिलचे वेतन हे सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार आहे. मे महिन्यात पोलिसांच्या हातात वाढीव वेतनच पडावे, याकरिता प्रशासनाकडून वेतन निश्चितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पोलीस आयुक्त ते उपनिरीक्षक पर्यंतच्या अधिकाऱ्यांची संख्या ही २०० पर्यंत आहे. राज्य शासनाने सातवा वेतन आयोग लागू केल्यापासून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट आहे. शासनाच्या निर्देशानुसार निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रथम वेतन आयोगाचा लाभ देण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे. आतापर्यंत अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीचे काम पूर्ण झाले. अधिकारी, कर्मचाऱ्यांना मे महिन्यात मिळणारे वेतन हे सातव्या वेतन आयोगानुसार देण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून तयारी सुरू आहे.
वेतन निश्चितीचे काम सुरू
पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या की, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीचे काम सुरू आहे. साडेतीन हजार कर्मचारी येथे कार्यरत आहेत. यापैकी आजपर्यंत अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती झाली. उर्वरित काम पूर्ण झाल्यावर एप्रिल महिन्याचे वेतन बिल सातव्या वेतन आयोगानुसार कोषागार कार्यालयास सादर केले जाईल. मे महिन्यात पोलिसांना सातव्या वेतन आयोगानुसारच वेतन मिळेल.
मार्चचे वेतन अद्याप नाही
मार्च महिन्याचे वेतन अद्यापही पोलिसांना प्राप्त झाले नाही. याविषयी चौकशी केली असता मार्च एंडिंगमुळे कोषागार कार्यालयाने वेतन बिले स्वीकारण्यास नकार दिला होता, यामुळे पोलिसांचे वेतन निघाले नाही. दरवर्षी मार्च एंडिंगच्या कालावधीत पोलिसांचे वेतन लांबते, असा अनुभव असल्याचे काही पोलिसांनी सांगितले.