खुशखबर ! अजिंठा लेणी आता शनिवार- रविवार सुद्धा पाहता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 06:03 PM2021-10-09T18:03:58+5:302021-10-09T18:07:44+5:30
Tourism in Aurangabad : जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी शनिवारी सुधारित आदेश काढून पर्यटनस्थळे पूर्वीप्रमाणे नियमित वेळेत सुरु ठेवण्याची सूचना भारतीय पुरातत्त्व विभागाला केली आहे.
सोयगाव ( औरंगाबाद ) : अजिंठालेणी ( Ajanta Caves) आता शनिवार-रविवार सुद्धा पर्यटकांसाठी खूली राहणार आहे. तर पूर्वीप्रमाणे सोमवारी लेणी बंद राहणार आहे. मंगळवार ते रविवार लेणी पूर्वीप्रमाणे सुरु राहणार असल्यामुळे मागील दोन वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या पर्यटन व्यावसायिकांना ( Tourism in Aurangabad ) मोठा दिलासा मिळणार आहे.
ब्रेक- दि- चेन अंतर्गत अजिंठा लेणी सोमवार ते शुक्रवार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, शनिवार- रविवार या सुटीच्या दिवशी लेणी बंद राहत असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असे, तसेच या दोन दिवसात लेणीस भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पर्यटक कमी येत असल्याने पर्यटन व्यवसायाचे अर्थचक्र डबघाईस आल्याचे दिसून येत होते. दरम्यान, राज्य शासनाने ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर शनिवार व रविवार या दोन दिवशी पर्यटनस्थळे पूर्ववत सुरु करण्याची मागणी पर्यटन व्यावसायिकांनी केली.
यावर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी शनिवारी सुधारित आदेश काढून पर्यटनस्थळे पूर्वीप्रमाणे नियमित वेळेत सुरु ठेवण्याची सूचना भारतीय पुरातत्त्व विभागाला केली आहे. या पार्श्वभूमीवर आता अजिंठालेणी मंगळवार ते रविवार पूर्वीप्रमाणे नियमित वेळेत सुरु राहणार आहे. नियमांनुसार दर सोमवारी लेणी पूर्वीप्रमाणे बंद असेल. जिल्हाधिकाऱ्याच्या या निर्णयानंतर पर्यटन व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रविवारपासून ( दि.१० ) या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.