सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात गुड न्यूज; 'अर्पिता' वाघिणीने दिला तीन पांढऱ्या बछड्यांना जन्म

By मुजीब देवणीकर | Published: September 7, 2023 04:27 PM2023-09-07T16:27:21+5:302023-09-07T16:28:35+5:30

या तीन बछड्यांच्या आगमनामुळे आता प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या पुन्हा १४ वर पोहचली आहे.

Good News at Siddharth Zoo; 'Arpita' tiger gave birth to three white calves | सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात गुड न्यूज; 'अर्पिता' वाघिणीने दिला तीन पांढऱ्या बछड्यांना जन्म

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात गुड न्यूज; 'अर्पिता' वाघिणीने दिला तीन पांढऱ्या बछड्यांना जन्म

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात अर्पिता नावाच्या पांढऱ्या वाघिणीने तीन गोंडस बछड्यांना आज जन्म दिला. सकाळी सात ते दुपारी दोन वाजेदरम्यानच्या वेळात अर्पिताने या बछड्यांना जन्म दिला. माता आणि बछाड्यांची तब्येत चांगली असून वाघीण स्वतः बछड्यांची निगा राखताना दिसून आली.

वीर व अर्पिता वाघांच्या जोडीच्या मिलनातून या बछड्यांचा जन्म झाला आहे, अशी माहिती मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी दिली. अर्पिता व तिच्या बछड्यांची प्राणिसंग्रहालय पशुवैद्यकांकरवी तपासणी करण्यात आली. माता व बछड्यांची तब्येत चांगली आहे. बछडे मातेचे दूध देखील पित आहेत. वाघीण व बछड्यांची काळजी घेण्यासाठी चोवीस तास कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तीन बछड्यांच्या जन्मामुळे आता पांढरे सहा व पिवळे आठ अशी वाघांची एकूण संख्या १४ वर पोहचली आहे.

आतापर्यंत ४३ वाघांचा जन्म
देशभर वाघांची संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात असताना छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील वाघांचा जन्मदर मात्र चांगला आहे. आत्तापर्यंत ४३ वाघांचा जन्म झाला आहे. पालिकेने देशभरातील अनेक प्राणिसंग्रहालयाला वाघ दिले आहेत. एकट्या समृद्धी वाघिणीने डझनभर बछड्यांना जन्म दिला आहे. पालिकेने १९९५ मध्ये पंजाबच्या सतबीर झूमधून पिवळ्या तर ओरिसातील भुवनेश्वर येथील प्राणिसंग्रहालयातून पांढर्‍या वाघांची जोडी आणली होती. त्यापासून आजवर ४३ वाघांचा येथे विस्तार झाला.

Web Title: Good News at Siddharth Zoo; 'Arpita' tiger gave birth to three white calves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.