खुशखबर ! २०२० मध्ये औरंगाबादला मिळणार विकासकामांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 07:28 PM2020-01-01T19:28:52+5:302020-01-01T19:32:37+5:30
अनेक प्रकल्प शहराच्या वैभवात भर घालणार
औरंगाबाद : नवीन वर्षात औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याला अनेक नवीन प्रकल्प, विकासकामांची भेट मिळणार आहे. तब्बल ३० गुळगुळीत सिमेंटचे रस्ते, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, सेफ सिटीअंतर्गत ७५० सीसीटीव्ही, शहराची तहान भागविणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन यासह बरेच काही मिळणार आहे.
शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू म्हणजे महापालिका प्रशासन होय. नवनियुक्त आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी पहिल्याच दिवशी ऐतिहासिक औरंगाबाद शहराला गतवैभव प्राप्त करून देण्याचा मनोदय व्यक्त केला. प्रशासकीय कामकाजाचा चांगला अनुभव असलेल्या पाण्डेय यांचा लोकसहभागाशिवाय कोणतेच काम यशस्वी होणार नाही, यावर दांडगा विश्वास आहे. त्यामुळे नवीन वर्षात ते कोणकोणते प्रकल्प औरंगाबादकरांसाठी राबविणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चार वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराची निवड झाली. मात्र, शहर स्मार्ट झाले नाही. स्मार्ट सिटी योजनेची २३० कोटींहून अधिक रक्कम पडून आहे. नवीन वर्षात स्मार्ट सिटीतील उपक्रमांचा श्रीगणेशा होण्याची दाट शक्यता आहे. ऐतिहासिक दरवाजांची डागडुजी, महापालिकेच्या काही शाळा स्मार्ट होतील. आरोग्य केंद्र स्मार्ट होतील. महापालिकेच्या तिजोरीत दोन वर्षांपासून पैसेच येत नव्हते. नवनियुक्त आयुक्तांनी तिजोरीत पैसे कसे आणावे, याचे कसब अधिकारी, कर्मचाऱ्यांना दाखवून दिले. त्यामुळे नवीन वर्षात चार चांगली विकासाची कामे होणार, हे निश्चित.
शहर आणि जिल्ह्यात किमान १५ योजना मार्गी लागण्याची शक्यता
३० गुळगुळीत रस्ते मिळणार
मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकर खड्ड्यांचा त्रास सहन करीत आहेत. ३० मोठे सिमेंट रस्ते औरंगाबादकरांच्या सेवेत दाखल होतील. १०० कोटी रुपये खर्च करून हे रस्ते तयार करण्यात येत आहेत. हा निधी संपताच राज्य शासन शहरातील रस्त्यांसाठी आणखी २६७ कोटी रुपये देण्यास तयार आहे.
१६८० कोटींची पाणीपुरवठा योजना
मागील पंधरा वर्षांपासून औरंगाबादकरांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ती म्हणजे नवीन पाणीपुरवठा योजना. नवीन वर्षात १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन होणार आहे. या कामाची निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी किंवा मनपा निवडणुकीनंतर हे काम घेणाऱ्या कंपनीला वर्कआॅर्डर मिळेल.
सेफ सिटीत ७५० सीसीटीव्ही
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत तब्बल ७५० ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. शहराच्या सुरक्षेसाठी हे मोठे कवच राहणार आहे. सीसीटीव्हीचे कंट्रोल रूम मनपा आणि पोलीस आयुक्तालयात ठेवण्यात येणार आहे.
कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प
चिकलठाणा येथे दररोज १५० मेट्रिक टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया होत आहे. त्याच पद्धतीने पडेगाव येथे प्रकल्प उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. कांचनवाडी येथे ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. नवीन वर्षात हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होतील.
सुपर स्पेशालिटी रुग्णालय
केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने १५० कोटी रुपयांच्या निधीतून घाटीत सुपर स्पेशालिटी रुग्णालय (ब्लॉक)उभारण्यात येत आहे. इमारतीचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. जवळपास २६ कोटींची यंत्रसामुग्रीही दाखल झालेली आहे. खाटा, आॅक्सिजन यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा, अशा अनेक गोष्टींचे काम झालेले आहे. अत्याधुनिक आणि स्वयंचलित शस्त्रक्रियागारही सज्ज झालेले आहे. परंतु पाणी आणि विजेच्या जोडणीसह पदनिर्मितीची प्रतीक्षा केली जात आहे. नव्या वर्षात हे प्रश्न मार्गी लागून सुपर स्पेशालिटी उपचार सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
हज हाऊस, वंदेमातरम् सभागृह
किलेअर्क येथे सिडको प्रशासनाकडून हज हाऊस, वंदेमातरम् सभागृहाचे काम सुरू आहे. यामध्ये वंदेमातरम् सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. काही वर्षांपासून औरंगाबादकर या दोन्ही प्रकल्पांची आतुरतेने वाट पाहत आहेत. नवीन वर्षात दोन्ही प्रकल्पांचे लोर्कापण होईल, अशी अपेक्षा आहे.
बसपोर्ट, मध्यवर्ती बसस्थानकाची उभारणी
पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादेतील सिडको बसस्थानकाच्या जागी बसपोर्ट उभारण्यात येत आहे. तर मध्यवर्ती बसस्थानकाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या दोन्हीचे २८ आॅगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले. भूमिपूजनाच्या ४ महिन्यांनंतरही कामाला सुरुवात झालेली नाही. नव्या वर्षात या दोन्ही कामांचा श्रीगणेशा होईल. शहरात दशकभरापासून अद्ययावत बसस्थानकाची प्रतीक्षा आहे.
सफारी पार्कच्या कामाचा श्रीगणेशा
१४५ कोटी रुपये खर्च करून मिटमिटा येथे सफारी पार्क उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने हिरवी झेंडी दाखविली आहे. लवकरच या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. नवीन वर्षात या कामाचा श्रीगणेशा होणार आहे.
महिला व नवजात शिशू रुग्णालय
शहरातील दूध डेअरीच्या जागेत २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाला उभारणीसाठी १११ कोटी ८९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक व आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामासाठी निधी बांधकाम विभागाकडे वर्ग होण्यासह रुग्णालयाच्या भूमिपूजनाकडे लक्ष लागले आहे. नव्या वर्षात भूमिपूजन होईल, अशी आशा आहे.
२०० खाटांचा स्वतंत्र माता व बालसंगोपन विभाग
राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे घाटीत २०० खाटांचा स्वतंत्र माता व बालसंगोपन विभाग (एमसीएच विंग) उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या विभागाची इमारत पाच मजली राहणार आहे. यासाठी ३८ कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. या विभागाच्या माध्यमातून माता व नवजात शिशूंवर एकाच छताखाली उपचार करण्याची योजना आखण्यात आली आहे.
समृद्धीचा पहिला टप्पा पूर्ण होणार
२०२० मध्ये समृद्धी महामार्गाचे (बाळासाहेब ठाकरे महामार्ग) पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होण्याची अपेक्षा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांनी व्यक्त केली. महामार्गाचे काम ३० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. नववर्षाच्या पावसाळ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात समृद्धीचे काम पूर्ण होईल. औरंगाबाद- जालना जिल्ह्यात १३६ कि.मी.मधून हा महामार्ग जाणार असून, त्यासाठी सपाटीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. काँक्रिटीकरणातून बांधण्यात येणाऱ्या अंडरपासच्या कामांची सुरुवात झालेली आहे. दिवसरात्र महामार्गाचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. २०२० च्या डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणच्या कामातील महत्त्वाची जंक्शन्स पूर्ण होतील, असा दावा सूत्रांनी केला. समृद्धी महामार्ग ७०१ कि़मी. लांबीचा असून, १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर ७ ते ८ तासांवर येणार आहे. औरंगाबाद तालुक्यातील ३५ गावे, गंगापूर ११ गावे, वैजापूरमधील १५ गावांतील जमीन महामार्गासाठी संपादित केली आहे. जालना जिल्ह्यातील २५ गावांतील भूसंपादन झाले आहे. महामार्गाच्या बांधकामासाठी २८ हजार कोटींचे कर्ज काढण्यात येणार आहे. २७ हजार कोटींची इक्विटी आहे, तर ६ हजार ३९६ कोटी रुपये सरकारी वाटा असणार आहे. ५५ हजार कोटींचा हा प्रकल्प असून, जुलै २०२१ पर्यंत त्याचे काम पूर्ण होईल, असा दावा करण्यात येत आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यांत महामार्गाचे काम सुरू आहे.
धुळे-सोलापूर हायवे पूर्ण होणार
डिसेंबर २०२० पर्यंत धुळे- औरंगाबाद- सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २११, टप्पा क्र. २ वाहतुकीसाठी खुला होणे शक्य होईल. औट्रम घाटाचे काम वगळता दुसऱ्या टप्प्यातील काम जवळपास संपले. मार्च २०२१ ही रस्त्याची डेडलाईन असली तरी वाहतुकीसाठी तो मार्ग येत्या नववर्षांत ८५ टक्क्यांपर्यंत खुला होईल. सध्या कन्नडपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बहुतांश ठिकाणी चौपदरी वाहतूकही सुरू आहे. काही ठिकाणी वळण देऊन रस्त्याचे काम सुरू ठेवलेले आहे. ते कामदेखील येत्या नववर्षात पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे काम पूर्ण झाले असून, त्यावरून वाहतूक सुरू आहे. झाल्टा फाटा ते गांधेलीमार्गे वाल्मी ते पैठण लिंक रोडपासून पुढे माळीवाडा ते कन्नडपर्यंतच्या कामाला सध्या गती आलेली आहे, असे एनएचएचआय सूत्रांनी सांगितले.