औरंगाबादकरांना खुशखबर ! शरद पवारांच्या वाढदिवशी मुख्यमंत्री करणार नवीन जलवाहिनीचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 12:33 PM2020-12-10T12:33:33+5:302020-12-10T12:35:31+5:30

Sharad Pawar, Uddhav Thakarey, Aurangabad News जलवाहिनीसोबतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आणि सफारी पार्कच्या भूमिपूजनाचा नारळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फुटणार आहे.

Good news to Aurangabadkars! On Sharad Pawar's birthday, the Chief Minister will pay homage to the new navy | औरंगाबादकरांना खुशखबर ! शरद पवारांच्या वाढदिवशी मुख्यमंत्री करणार नवीन जलवाहिनीचे भूमिपूजन

औरंगाबादकरांना खुशखबर ! शरद पवारांच्या वाढदिवशी मुख्यमंत्री करणार नवीन जलवाहिनीचे भूमिपूजन

googlenewsNext
ठळक मुद्देया योजनेचे खाजगीकरण होणार नाही. योजनेची किंमत १६८० कोटी मनपा, एमजीपीचे पीएमसी युनिट असणार

औरंगाबाद : महाविकास आघाडीचे शिल्पकार खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच १२ डिसेंबरचे औचित्य साधून १६८० कोटी रुपयांच्या जलवाहिनीसोबतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आणि सफारी पार्कच्या भूमिपूजनाचा नारळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फुटणार आहे. या योजनेतील एक जलकुंभ गरवारे स्टेडियम परिसरात असणार आहे. तेथे मुख्यमंत्र्यांसह नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, सर्व आमदारांच्या उपस्थितीत भूमिपूजन होईल.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी सायंकाळी आभासी पत्रकार परिषदेत भूमिपूजनाची घोषणा केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विकासकामांच्या भूमिपूजनाचा बार शिवसेनेने उडविण्याची तयारी केली आहे. मागील तीन मनपा निवडणुकांपासून शहर पाणीपुरवठा योजना शिवसेनेच्या जाहीरनाम्यात असते. समांतर जलवाहिनीची योजना सुरू होऊन संपुष्टात आल्यानंतर मागील सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवी पाणीपुरवठा योजना आणली. मात्र, त्यामध्ये त्रुटी राहिल्याने ती मंजूर झाली नव्हती. आता राज्यातील महाआघाडी सरकारने मंजूर केलेल्या योजनेचे भूमिपूजन १२ डिसेंबर रोजी होत आहे.

खा. पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भूमिपूजन होत आहे काय, यावर पालकमंत्री देसाई म्हणाले, होय तसे म्हणायला हरकत नाही. पाणीपुरवठा योजनेला पैसा कुठून आणणार, यावर ते म्हणाले, शासनाने नगरोत्थान, अमृत योजनेतून यासाठी तरतूद केली आहे. जुन्या योजनेची रक्कम व्याजासह ५०० कोटींच्या आसपास जमा झाली आहे, ती रक्कमही केंद्राकडून या योजनेसाठी वापरण्यासाठी पत्रव्यवहार केला जाईल. या योजनेचे खाजगीकरण होणार नाही. पाणीपट्टीदेखील वाजवी, वास्तववादी असेल, असा दावा त्यांनी केला. यावेळी आ. अंबादास दानवे, आ. प्रदीप जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, विकास जैन, नरेंद्र त्रिवेदी, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, राजेंद्र जंजाळ आदींची उपस्थिती होती.

असे आहे ठाकरे स्मारक, सफारी पार्क
सिडको एन-६ परिसरात एमजीएमलगत असलेल्या ७ हेक्टर जागेत २२ कोटींतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. बांधकाम विभागाच्या तांत्रिक छाननी समितीची मान्यता यासाठी मिळाली आहे. मिटमिटा येथील ८४ एकर जागेत सफारी पार्क होणार असून, तेथे संरक्षक भिंत, गेट बसविणे, सपाटीकरण करणे, प्राण्यांचे पिंजरे व इतर कामे केली जाणार आहेत. सोबत १५२ कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन व उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हर्च्युल पद्धतीने होईल, असे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.

जलवाहिनीच्या कामाबाबत सरकारचा दावा :
- योजनेची किंमत १६८० कोटी
-  पूर्ण होण्याचा कालावधी ३ वर्षे
-  मनपा, एमजीपीचे पीएमसी युनिट असणार
-  शहराच्या ३३ लाख लोकसंख्येला पाणी पुरेल
-  सातारा-देवळाईचा योजनेत समावेश
-  ३९२ एमएलडी पाण्याचा रोज पुरवठा
-  एकूण ५३ नवीन जलकुंभ बांधणार
-  मुख्य जलवाहिनी ४० कि.मी.ची असेल
-  १९११ कि.मी. विस्तारित वितरण व्यवस्था
-  ९० हजार कुटुंबांना नळजोडण्या
-  नक्षत्रवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र

Web Title: Good news to Aurangabadkars! On Sharad Pawar's birthday, the Chief Minister will pay homage to the new navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.