शुभ वार्ता! ऑरिकमध्ये नवीन दोन कंपन्या येणार; ८०० जणांना मिळणार रोजगार

By बापू सोळुंके | Published: March 3, 2023 07:53 PM2023-03-03T19:53:06+5:302023-03-03T20:00:23+5:30

ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोअंतर्गत(डीएमआयसी) असलेल्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात दहा हजार एकर जमीन उपलब्ध आहे.

Good news! Auric will have two new companies; 800 people will get employment | शुभ वार्ता! ऑरिकमध्ये नवीन दोन कंपन्या येणार; ८०० जणांना मिळणार रोजगार

शुभ वार्ता! ऑरिकमध्ये नवीन दोन कंपन्या येणार; ८०० जणांना मिळणार रोजगार

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : ऑरिक सिटीच्या शेंद्रा औद्योगिक पट्ट्यात बहुराष्ट्रीय कोहलर कंपनी ६०० कोटींची, तर औरंगाबादेतील धूत ट्रान्समिशन कंपनी ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही कंपन्यांमुळे थेट ८०० लोकांना रोजगार मिळणार असल्याचे ऑरिक सिटीच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोअंतर्गत(डीएमआयसी) असलेल्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात दहा हजार एकर जमीन उपलब्ध आहे. शेंद्रा औद्योगिक पट्ट्यातील सुमारे ८० टक्के भूखंड उद्योजकांनी घेतले आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांनी तेथे उत्पादन सुरू केले आहे; तर बिडकीन औद्योगिक पट्ट्यातील १६३ एकरांवर फूड पार्कसाठी पायाभूत सुविधा उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. दोन्ही औद्योगिक पट्ट्यांत बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक करावी, यासाठी ऑरिकचे वरिष्ठ अधिकारी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. यासोबत स्थानिक गुंतवणूकदारांनीही तेथे गुंतवणूक करावी, याकरिता प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना यश येण्यास सुरुवात झाली आहे. शेंद्रा औद्योगिक पट्ट्यात इंजिन बनविणारी बहुराष्ट्रीय कोहलर कंपनी गुंतवणुकीसाठी पुढे आली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात ऑरिकला भेट दिल्यानंतर तेथील उपलब्ध भूखंडाची पाहणी केली. यातील २५ एकरांचा भूखंड त्यांना पसंत आल्याने तेथे आपले उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. ही कंपनी शेंद्र्यामध्ये टप्प्याटप्प्यात ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या कंपनीमुळे थेट ५०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

धूत ट्रान्समिशनची सुमारे ३०० कोटींची गुंतवणूक
वायरिंग हारनेस, इलेक्ट्रॉनिक सेन्सार आणि कंट्रोलर, ऑटोमोटिव्ह स्विचेस, पाॅवर कॉर्ड्स आणि ऑटोमोटिव्ह केबल निर्मिती करणारी औरंगाबादेतील धूत ट्रान्समिशन प्रा. लिमिटेड कंपनीनेही ऑरिकमध्ये ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. धूत ट्रान्समिशनने ऑरिकमध्ये २० एकर भूखंडाची मागणी केली आहे. या भूखंडावर कंपनीला उत्पादन करण्यासाठी सुमारे २५० जणांना रोजगार मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ऑरिक सिटीमध्ये बहुराष्ट्रीय आणि स्थानिक कंपन्यांनी गुंतवणूक करावी, यासाठी आम्ही विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहोत. याअंतर्गत जानेवारी महिन्यात मसिआसोबत एक्स्पो घेतला होता. यापुढील ‘ॲडव्हांटेज महाराष्ट्र’चे पावसाळ्यानंतर आयोजन केले जाऊ शकते. ऑरिकमध्ये कोहलर आणि धूत ट्रान्समिशन कंपनी गुंतवणुकीसाठी पुढे आली. या दोन्ही कंपन्या तेथे टप्प्याटप्प्याने अनुक्रमे ६०० कोटी आणि ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून स्वतंत्र कारखाना सुरू करतील. यामुळे थेट ८०० लोकांना रोजगार उपलब्ध होईल.
- सुरेश काकाणी, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र इंडस्ट्रिअल टाउनशिप लिमिटेड

Web Title: Good news! Auric will have two new companies; 800 people will get employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.