खूशखबर.. पुन्हा गाठता येणार दीड तासात बंगळुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 06:15 PM2022-04-06T18:15:38+5:302022-04-06T18:16:04+5:30
१५ एप्रिलपासून विमानसेवेच्या हालचाली
औरंगाबाद : औरंगाबादहून पुन्हा एकदा दीड तासात बंगळुरू गाठता येणार आहे. इंडिगोची सकाळच्या वेळेत ही विमानसेवा १५ एप्रिलपासून पुन्हा एकदा सुरू होण्याच्या हालचाली असल्याची माहिती विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली.
कोरोनापूर्वी स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन्ही कंपन्यांकडून बंगळुरूसाठी विमानसेवा दिली जात होती, परंतु कोरोनाचा फटका बसला आणि बंगळुरूची हवाई कनेक्टिव्हिटी तुटली. आयटी हब म्हणून बंगळुरूची ओळख आहे. त्यामुळे नोकरी, शिक्षणासाठी औरंगाबादहून बंगळुरूला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
नोव्हेंबर, २०१९ मध्ये पहिल्यांदा बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू झाली होती. त्यास प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कोरोनामुळे त्यात खंड पडला. आता प्रवाशांचीही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
बहुतांश प्रवासी बंगळुरू विमानसेवेसाठी शिर्डी विमानतळ गाठतात. औरंगाबादहून ही सेवा पुन्हा नव्याने विमानसेवा सुरू झाल्यास शिर्डीला जाण्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागणार नाही. ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी विमानसेवा सुरू होण्यासंदर्भात दुजोरा दिला नाही.
स्पाइस जेट, जेट एअरवेजची प्रतीक्षा
स्पाइस जेट, जेट एअरवेजकडून पुन्हा एकदा विमानसेवा सुरू केली जाईल, असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात येत होते, परंतु या दोन्ही कंपन्यांच्या विमानसेवेची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
सकाळच्या वेळेत विमानसेवा गरजेची
औरंगाबादहून सकाळच्या वेळेत विमानसेवा सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे इतर विमानतळांवर पोहोचल्यानंतर इतर कनेक्टिंग फ्लाइटने प्रवास करणे सोपे होते, असे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे जसवंतसिंग म्हणाले.