खुशखबर! नवीन वर्षात छत्रपती संभाजीनगरच्या वैभवात भर पाडणारे मोठे प्रकल्प सुरू होतील
By मुजीब देवणीकर | Published: November 17, 2023 07:35 PM2023-11-17T19:35:10+5:302023-11-17T19:35:20+5:30
महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या माध्यमातून शहराला नवीन वर्षात काही महत्त्वाचे प्रकल्प मिळतील. या प्रकल्पांमुळे शहराच्या वैभवात भर पडेल, असा विश्वास महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.
पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र ड्रेनेज प्रकल्प, मकाई गेटला दोन्ही बाजूंनी रस्ता, जुन्या शहरातील गेटजवळील पूल पाडून नव्याने बांधणे, महापालिकेचा बांधकाम साहित्यापासून गट्टू तयार करणारा प्रकल्प, नारेगाव येथील संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया अशा कितीतरी प्रकल्पांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.
पश्चिम मतदारसंघातील मिटमिटा, पडेगाव या नवीन वसाहतींना २५० कोटी रुपये खर्च करून ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी आराखडा तयार आहे. फक्त शासन मंजुरीची प्रतीक्षा आहे. मकाई गेटला दोन्ही बाजूंनी रस्ता व्हावा असे नियोजन करतोय. एमआयडीसी रेल्वे स्टेशन येथे ओव्हर ब्रिज, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्या शहरातील तीन पूल पाडून नवीन बांधण्यासाठी १०० कोटी देण्याचे आश्वासन दिले. त्याचाही पाठपुरावा मनपाकडून सुरू आहे. देवळाई येथे आदर्श रोडचे नियोजन केले. बांधकाम साहित्यापासून गट्टू तयार करणे, नारेगाव येथील संपूर्ण पडीक कचऱ्यावर प्रक्रिया, बायोमेडिकल वेस्टसाठी अत्याधुनिक प्रकल्प उभारणी, प्रत्येक घरावर डिजिटल ॲड्रेस बसविण्यासाठी संबंधित बँकेसोबत करार करण्यात येणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होईल. सिडको नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जाधववाडी येथील बस डेपोचे कामही संपत आले आहे.
चार उद्यानांचा विकास
छत्रपती संभाजीनगर फर्स्ट या संस्थेला चार मोठे उद्यान विकसित करण्यासाठी देण्यात येणार आहेत. लवकरच या संस्थेचे अध्यक्ष मुकुंद भोगले पदभार घेतील. यामध्ये उद्योगांचाही वाटा असेल. चार उद्यान कोणते हे लवकरच निश्चित होईल. एन-८ मधील बॉटनिकल गार्डन येथे ट्रेन सुरू केली. बोटिंग सुरू होणार आहे. या भागात खाऊ गल्लीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.