गुड न्यूज : ग्रामीण भागातील पाचवी ते आठवीचे वर्ग आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:03 AM2021-09-06T04:03:32+5:302021-09-06T04:03:32+5:30
--- नीलेश गटणे : जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात --- औरंगाबाद : कोरोनामुळे शाळा बंद असल्याने पाचवी ...
---
नीलेश गटणे : जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
---
औरंगाबाद : कोरोनामुळे शाळा बंद असल्याने पाचवी ते सातवीचे विद्यार्थी गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष शिक्षण प्रवाहापासून दूर आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी आज, सोमवार (दि. ६)पासून ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू केले जाणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी केली.
शहरातील एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात रविवारी आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. त्यांनी केलेल्या घोषणेचे जिल्हाभरातील शिक्षकांकडून स्वागत करण्यात येत आहे. पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक करताना शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण म्हणाले की, मुख्य कार्यकारी अधिकारी आज सर्वांना गुड न्यूज देणार आहेत, असे म्हटल्यावर सभागृहातील सर्वांना त्यांच्या भाषणाची उत्सुकता लागली. त्यानंतर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे म्हणाले की, आठवी ते बारावीचे वर्ग ग्रामीण भागात सुरू होते. आता पाचवी ते सातवीचे वर्गही सुरू करण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच परवानगी दिली आहे. त्यामुळे आज, सोमवारपासून पाचवी ते सातवीचे वर्गही ग्रामीण भागात सुरू केले जाणार आहेत. ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट असली तरीही आता प्रत्येकाची जबाबदारीदेखील वाढली आहे. कोरोनाची दिलेली ‘एसओपी’ काटेकोर पाळावी लागेल. ज्या शिक्षकांनी लसीचे डोस घेतले नाहीत. त्यांनी ‘आरटीपीसीआर’ तपासणी करून घ्यावी व निगेटिव्ह अहवाल घेऊनच शाळेत यावे.
---
‘त्या’ ५७ गावांतील विद्यार्थ्यांना करावी लागणार प्रतीक्षा
जिल्ह्यात ५७ गावांत कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याने त्या गावातील शाळा सुरू करता येणार नाहीत. शाळा सुरू झाल्यावर कोरोना रुग्ण गावात आढळला, तर तेथील शाळा पुन्हा लगेच बंद कराव्या लागतील. यासंदर्भातील सविस्तर नियमावली शाळेपर्यंत दिली जाईल. त्याचे पालन काटेकोरपणे करा, अशा सूचनाही नीलेश गटणे यांनी दिल्या. ही घोषणा करताच शिक्षकांसह सोहळ्याला उपस्थितांना टाळ्या वाजवून स्वागत केले.