आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांसाठी आनंद वार्ता; आजपासून २५ हजारांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 01:05 PM2024-08-22T13:05:43+5:302024-08-22T13:06:07+5:30
पतसंस्थेतील सुमारे ३५ हजार ठेवीदारांपैकी २६ हजार ५०० ठेवीदारांची २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आहेत.
छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत पैसे अडकलेल्या २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यात येणार आहेत. यामुळे जवळपास २७ हजार ठेवीदारांना दिलासा मिळेल.
याबाबत असलेल्या घडामोडी
जुलै महिना : दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यात आल्या.
उपनिबंधक कार्यालय : या कार्यालयाने कर्जवसुली करून ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या प्रक्रियेला दिला वेग.
१४ ऑगस्ट : गृहखात्याने मंजुरी देत ५६.१८ कोटींच्या ४६ संपत्तींच्या लिलाव करण्यास सांगितले.
कोणाच्या संपत्ती : पतसंस्थेच्या संचालक, व्यवस्थापकांच्या वैयक्तिक नावावर असलेल्या संपत्ती.
आता लक्ष : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासाठी प्रक्रिया राबवण्याकडे आता सर्वांचे लक्ष.
७५ टक्के ठेवीदारांना दिलासा
पतसंस्थेतील सुमारे ३५ हजार ठेवीदारांपैकी २६ हजार ५०० ठेवीदारांची २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आहेत. गुरुवारपासून २५ हजार रुपयांपर्यंत मुदत ठेव, बचत खाते व पिग्मी खाते असलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत केले जाणार आहे. अशा ठेवीदारांनी तातडीने दोन छायाचित्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याचे कागदपत्रे पतसंस्थेच्या एन-६ येथील मुख्य कार्यालयात जमा करण्याचे आवाहन प्रशासक सुरेश काकडे यांनी केले आहे. २० ऑगस्टपर्यंत ५२३ खातेधारकांना २६ लाख ४ हजार ३४३ रुपये परत करण्यात आले आहे. सध्या आदर्शकडे ३ कोटी रुपये जमा असून वसुलीत वाढ होऊन ही रक्कम ४ कोटींपर्यंत जाईल.
लिलाव सप्टेंबरमध्ये
संस्थाध्यक्ष, व्यवस्थापक, प्रवर्तक, भागीदार, सदस्य व अन्य व्यक्तींच्या नावे असलेली रक्कम, अन्य मालमत्तांची शासनाकडून जप्ती सुरू आहे. लिलाव प्रक्रियेची मुदत जिल्हाधिकारी व उपनिबंधकांच्या संयुक्त निर्णयानंतर निश्चित होईल. साधारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या लिलाव प्रक्रियेस प्रारंभ होण्याची शक्यता महसूल अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
ठेवीदारांना पैसे परत देण्यासाठी प्रयत्नशील
ठेवीदारांना पतसंस्थेच्या प्रशासकीय पातळीवर पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठेवीदारांनी अधिकाधिक संख्येने त्यांचे कागदपत्रे सादर करावीत. उर्वरित लिलाव प्रक्रिया निश्चित लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. सर्व ठेवीदारांना पैसे परत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
-दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी
आठ वर्षांतली मानकापेची माया
- २०१६ ते २०१९ : १०३ कोटी १६ लाख ७३ हजार ३८१ रुपयांचा घोटाळा.
- २०१८ ते २०२३ : ९९ कोटी सात लाख ९० हजार ५७९ रुपयांचा घोटाळा.
- २३ हजार ठेवीदार असे आहेत ज्यांच्या ठेवी १५ हजारांपेक्षा कमी आहेत. मात्र, त्यांच्याकडून अत्यल्प प्रतिसाद.
- हे मिळून २६ हजार ५०० ठेवीदार असे ज्यांच्या २५ हजारापर्यंत ठेवी आहेत. आता त्यांना पैसे परत मिळतील.
या संपत्तीचा लिलाव होणार
मानकापे कुटुंब - ४६ संपत्ती
आदर्श ग्रुप - १९ संपत्ती
मानकापे व अन्य संचालक -३९ संपत्ती
आव्हान मोठेच तरीही अपेक्षा
-२८७,७६,६९,३२५ फसवणुकीची रक्कम.
-अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ मिळून २१ मुख्य आरोपी. ६ गुन्ह्यांमध्ये एकूण ११२ आरोपी.
-९२,१६४ एकूण ठेवीदार.