औरंगाबादसाठी खुशखबर! ऑरिकमध्ये ग्रीनको कंपनी करणार १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
By बापू सोळुंके | Published: January 17, 2023 06:51 PM2023-01-17T18:51:53+5:302023-01-17T18:52:36+5:30
दावोस येथे कंपनीचा राज्य सरकारसोबत करार
औरंगाबाद : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच औरंगाबादेतील ऑरिक सिटीमध्ये मोठे उद्योग येण्यास सुरुवात झाली आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची ग्रीनकाे कंपनी ऑरिकमध्ये वर्षभरात सुमारे १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या कंपनीमुळे थेट सुमारे साडेसहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फाेरमच्या बैठकीत कंपनीसोबत या गुंतवणुकीविषयी सामंजस्य करार झाल्याची घोषणा महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करून दिली.
ऑरिक सिटीअंतर्गत असलेल्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडाेरच्या (डीएमआयसी) शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात जागतिक दर्जाचे औद्योगिक इन्फ्रास्ट्रक्चर असलेली दहा हजार एकर जमीन उपलब्ध आहे. यासोबतच समृद्धी महामार्गाला ऑरिकची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. एवढेच नव्हे तर चिकलठाणा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ, विजेवर चालणारी रेल्वे असल्याने दळणवळणाची उत्तम सुविधा येथे आहे. पंचतारांकित हॉटेल्स, नॅशनल लॉ स्कूल, नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रशिक्षण संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासारख्या नामांकित शैक्षणिक संस्था येथे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात पाच औद्याेगिक वसाहती असून सुमारे साडेचार ते पाच हजार लहान-मोठे उद्योग येथे कार्यरत आहेत.
#Greenko -
— Uday Samant (@samant_uday) January 17, 2023
Proud to announce an agreement with Greenko for a big-ticket investment of ₹ 12000 crore in Chhatrapati SambhajiNagar (Aurangabad) for a renewable energy plant. The project will create employment for 6300 people.#wef23#WEF2023#WorldEconomicForum#MaharashtraInDavospic.twitter.com/yq3GzWeIKu
औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या औरंगाबादजवळील शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीमध्ये मोठे उद्योग यावेत, यासाठी स्थानिक उद्योजकांच्या ‘सीएमआयए’ आणि ‘मसिआ’ या संघटना सतत शासनाकडे पाठपुरावा करीत होत्या. एवढेच नव्हे तर सीएमआयएचे पदाधिकारी केंद्र, राज्य सरकारसोबतच विविध उद्योगांच्या प्रमुखांना भेटून औरंगाबादेत गुंतवणूक करणे फायदेशीर असल्याचे पटवून देत आहेत. या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. दावोस येथे सुरू असलेल्या इंटरनॅशनल इकोनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि उद्योग विभागाचे अधिकारी गेले आहेत. उद्योगमंत्री सामंत यांनी मंगळवारी ट्वीट करीत ऑरिकमध्ये ग्रीनको ही अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील नामांकित कंपनी १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे घोषित केले. उद्योगमंत्र्याच्या या घोषणेमुळे औरंगाबादेतील उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ग्रीनको कंपनीकडून थेट साडेसहा हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोन्याचा दिवस
दावोस येथून उद्योगमंत्र्यांनी ट्वीट करून ग्रीनको कंपनी १२ हजार कोटी रुपयांची ऑरिकमध्ये गुंतवणूक करणार असल्याची बातमी कळाली. औरंगाबादच्या औद्योगिक विश्वासाठी हा सोन्याचा दिवस आहे. मोठा प्रकल्प येथे यावा, यासाठी सीएमआयए प्रयत्न करीत आहेत.
- नितीन गुप्ता, अध्यक्ष, सीएमआयए