छत्रपती संभाजीनगरकरांसाठी खुशखबर; समृद्धी वाघिणीने दिला एका बछड्यास जन्म
By मुजीब देवणीकर | Published: July 19, 2023 05:27 PM2023-07-19T17:27:37+5:302023-07-19T17:28:16+5:30
छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयात आणखी एका वाघाचे आगमन
छत्रपती संभाजीनगर: शहरातील सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयातील समृद्धी वाघिणीने आज सकाळी एका बछड्याला जन्म दिला. समृध्दी वाघीण व बछड्याची तपासणी प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक यांचे मार्फत करण्यात आलेली आहे. दोघांची तब्येत चांगली आहे. बछडे आईचे दुध पितांना दिसून आले. वाघीण स्वतः बछड्याची निगा व काळजी घेत आहे. तसेच वाघीणीच्या व बछड्याच्या २४ तास देखभाली साठी कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
सिध्दार्थ व समृध्दी या वाघाच्या जोडीने पहिल्यांदा १२ नोव्हेंबर २०१६ रोजी तिन पिवळे व एक पांढरा बछड्यास जन्म दिला. दुसऱ्या वेळी २६ एप्रिल २०१९ रोजी चार बछड्यांना जन्म दिला. यात दोन पिवळे तर दोन पांढरे बछडे होते. तिसऱ्या वेळी २५ डिसेंबर २०२० रोजी पाच पिवळे बछड्यांना जन्म दिला आहे. तर चौथ्या वेळी एका बछड्यास जन्म दिला आहे.
एक जोडी पुण्यात, एक दोन वाघ गुजरातला
जन्म झालेल्या या वाघांमधील एक जोडी पुणे प्राणीसंग्रहालय येथे तर दोन पिवळे वाघ मादी हे अहमदाबाद प्राणीसंग्रहालय येथे स्थलांतरीत करण्यात आलेले आहेत. इतर वाघ प्राणीसंग्रहालयातच आहेत अशी माहिती प्र. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.