बच्चेकंपनीसाठी खुशखबर; स्वामी विवेकानंद उद्यानातील बुलेट ट्रेनचे लोर्कापण
By मुजीब देवणीकर | Published: June 20, 2024 06:21 PM2024-06-20T18:21:38+5:302024-06-20T18:21:51+5:30
सिद्धार्थ उद्यानात कमी व्हॅटची इलेक्ट्रिक मिनी ट्रेन चालविण्यात येत आहे. या ट्रेनला बच्चेकंपनीकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर : टीव्ही सेंटर भागातील स्वामी विवेकानंद उद्यानात बच्चेकंपनीसाठी बुधवारपासून बुलेट ट्रेन सुरू होणार आहे. आ. प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते मंगळवारी बुलेट ट्रेनचे लोकार्पण करण्यात आले. बीओटी तत्त्वावर महापालिका बुलट ट्रेन चालवत आहे. खासगी संस्थाच ट्रेन चालविणार असून, मनपाला २५ टक्के रॉयल्टी देईल.
सिद्धार्थ उद्यानात कमी व्हॅटची इलेक्ट्रिक मिनी ट्रेन चालविण्यात येत आहे. या ट्रेनला बच्चेकंपनीकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हे डोळ्यासमोर ठेवून सिडको-हडको भागातील बच्चेकंपनीसाठी स्वामी विवेकानंद उद्यानात बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. मागील आठ महिन्यांपासून अत्याधुनिक ट्रेन उभारणीचे काम सुरू होते. विश्वा मल्टिसर्व्हिसेस कंपनीला बीओटी तत्त्वावर काम देण्यात आले. आ. जैस्वाल, प्रशासक जी. श्रीकांत यांनी ट्रेनमध्ये बसून चक्कर मारून लोकार्पण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, संतोष वाहुळे, कार्यकारी अभियंता आर. एन. संधा, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद यांची उपस्थिती होती. सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू यांनी सूत्रसंचालन, तर विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले.
एकच सेंट्रल पार्क
प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले की, विविध देशांमध्ये शहरात मध्यभागी एक सेंट्रल पार्क असते. हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून स्वामी विवेकानंद उद्यानाची निवड केली. उद्यान २४ एकरात पसरलेले आहे. याठिकाणी सेंट्रल पार्क, ॲडव्हेंचर पार्क, ग्लो गार्डन, पेट पार्क आणि जनावरांसाठी स्मशानभूमी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्पा म्हणून मिनी बुलेट ट्रेनचे लोकार्पण झाले.
बुलेट ट्रेन, प्रकल्पाची वैशिष्ट्ये
७० लाख रुपये खर्च
०४ डब्बे बसण्यासाठी
४५० मीटरचा ट्रॅक
७.३० मिनिटात एक राउंड
२५ रुपये चिमुकल्यांना तिकीट
५० रुपये मोठ्यांना तिकीट
२५ टक्के रॉयल्टी मनपाला