गोवाप्रेमींसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगरहून विमानाने अवघ्या दोन तासांत गाठा गोवा
By सुमित डोळे | Published: May 24, 2024 07:17 PM2024-05-24T19:17:52+5:302024-05-24T19:21:03+5:30
गोव्यासह उपराजधानी नागपूरसाठी देखील छत्रपती संभाजीनगरहून विमानसेवा; अवघ्या दोन तासांत दोन्ही ठिकाणी उतरा
छत्रपती संभाजीनगर :गोवाप्रेमींसाठी इंडिगो विमान कंपनीने शहरातून सेवाप्रारंभ करण्याचे निश्चित केले आहे. नागपुर, छत्रपती संभाजीनगर ते गोवा, अशी ही विमानसेवा कार्यरत असेल. २ जुलै पासून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी कंपनीतर्फे ही सेवा प्रत्यक्षात सुरू होत होईल. यामुळे छत्रपती संभाजीनगरसह आसपासच्या जिल्ह्यातील प्रवाशांना शहरातून नागपुर व गोवा अवघ्या दोन तासांत गाठता येणार आहे.
अवघ्या २ तासात गोवा, नागपुरात उतरा
सामान्यत: छत्रपती संभाजीनगर ते गोवा बायरोड ७३२ किमी अंतरासाठी १५ तासांचा अवधी लागतो. मात्र, २ जुलै पासून ७८ आसनांच्या विमानसेवेमुळे अवघ्या २ तासांमध्ये गोव्यात पोहोचता येणार आहे. शहरासह, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणीतील गोवाप्रेमींची यामुळे वेळेची मोठी बचत होईल. शिवाय, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुर देखील अवघ्या २ तासात गाठता येईल.
अशी असेल सुविधा
मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी २ जुलै पासून इंडिगोची ही विमानसेवा दोन सुरू होईल. ही विमानसेवा मुळ लखनऊ वरुन सुरू होऊन गोव्यापर्यंत जाईल. तर गोव्यावरुन निघून छत्रपती संभाजीनगर, नागपुर ते लखनऊपर्यंत राहिल.
नागपुर - छत्रपती संभाजीनगर : ९:४० ते ११:००
छत्रपती संभाजीनगर - गोवा : ११:३० ते १३:३०
गोवा - छत्रपती संभाजीनगर : १४:१० / १६:१०
छत्रपती संभाजीनगर - नागपूर : १६:४० / १८:१०