खेळाडूंसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगरात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 20:14 IST2024-08-08T20:13:33+5:302024-08-08T20:14:37+5:30
आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम संदर्भातील प्रस्तावास क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत तत्वतः मान्यता देण्यात आली

खेळाडूंसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगरात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम
छत्रपती संभाजीनगर/मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम उभारण्यात येणार आहे. मंगळवारी या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियमला पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेत आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
पालकमंत्री सत्तार यांनी या संदर्भातील प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी यांना क्रीडा विभागास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयात छत्रपती संभाजीनगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम आणि गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात पालकमंत्री सत्तार यांनी मंगळवारी मुंबई येथे बैठक घेतली होती.
यावेळी सत्तार म्हणाले, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलातील खेळाडूंना क्रीडा संदर्भातील सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आणि आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम संदर्भातील प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी क्रीडा विभागास सादर करावा. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना यश मिळवता यावे यासाठी त्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे.