पशुपालकांना दिलासा देणारी बातमी; लम्पीमुळे दगावलेल्या पशुधनासाठी अर्थसाहाय्य पूर्ववत

By विजय सरवदे | Published: July 22, 2023 01:13 PM2023-07-22T13:13:28+5:302023-07-22T13:13:50+5:30

प्रस्ताव सादर करण्याचे जि. प. पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

Good news for ranchers; Reversal of financial assistance for livestock killed by Lumpy | पशुपालकांना दिलासा देणारी बातमी; लम्पीमुळे दगावलेल्या पशुधनासाठी अर्थसाहाय्य पूर्ववत

पशुपालकांना दिलासा देणारी बातमी; लम्पीमुळे दगावलेल्या पशुधनासाठी अर्थसाहाय्य पूर्ववत

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगामुळे दगावलेल्या गोवंशीय पशुधनाच्या पालकांना दिले जाणारे अर्थसाहाय्य मार्च महिन्यापासून थांबविण्यात आले होते. मात्र, विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात यावर सरकारला धारेवर धरण्यात आल्यानंतर ते अर्थसाहाय्य पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. तथापि, यासाठी पशुपालकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जि. प. पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

जानेवारी-फेब्रुवारीपासून जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी अधून-मधून काही प्रमाणात तो डोके वर काढतच राहिला. दरम्यान, या आजारामुळे दगावलेल्या गोवंशीय पशुधनाच्या पालकांना शासन निर्णयानुसार ३१ मार्चपर्यंत अर्थसाहाय्य देण्यात आले. त्यानंतर ते थांबविण्यात आले. त्यामुळे मार्चनंतर दगावलेल्या जनावरांचे पालक आर्थिक संकटात सापडले. आता रोखलेले अर्थसाहाय्य सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतल्यामुळे या पशुपालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. प्राप्त माहितीनुसार या आजाराने आतापर्यंत १ हजार ३१९ पशुधन दगावले. त्यापैकी १ हजार २८४ पशुधनाच्या पालकांना ३ कोटी ३० लाख ३९ हजार रुपये एवढे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे.

साधारणपणे सप्टेंबर २०२२ पासून लम्पी आजाराने अख्खा जिल्हा कवेत घेतला. यामुळे १२ हजारांहून अधिक जनावरे बाधित झाली. त्यापैकी १ हजार ३१९ जनावरे दगावली. उद्भवलेल्या लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या. सध्याही या आजाराला वेशीबाहेरच ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मिशन मोडवर गोठा स्वच्छता मोहीम, फवारणी करण्यात येत आहे. लसीकरणावरही भर देण्यात आला आहे. शिल्लक ५५ हजार तसेच आठ दिवसांपूर्वी प्राप्त २ लाख १५ हजार लसी अशा एकूण २ लाख ६५ हजार लसी जनावरांना देण्यात येत आहेत. आजपर्यंत १ लाख ३० हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

मार्चपर्यंत ३ कोटींचे अर्थसाहाय्य वाटप
लम्पीमुळे मयत गायीसाठी ३० हजार रुपये, बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार, तर वासराचा मृत्यू झाल्यास १६ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य संबंधित पशुपालकांना देण्यात येते. यानुसार मार्चपर्यंत १२८४ जनावरांच्या पालकांना ३ कोटी ३० लाख ३९ हजार रुपये एवढे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.

Web Title: Good news for ranchers; Reversal of financial assistance for livestock killed by Lumpy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.