विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! ‘विद्यापीठ’ लवकरच ‘पेट’ परीक्षा घेणार

By राम शिनगारे | Published: May 21, 2024 12:36 PM2024-05-21T12:36:27+5:302024-05-21T12:36:54+5:30

मागील दोन वर्षांपासून 'पेट' परीक्षा घेण्याची मागणी संशोधन इच्छुक विद्यार्थ्याकडून करण्यात येत होती.

Good news for students! BAMU will soon conduct the 'PET' exam | विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! ‘विद्यापीठ’ लवकरच ‘पेट’ परीक्षा घेणार

विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! ‘विद्यापीठ’ लवकरच ‘पेट’ परीक्षा घेणार

छत्रपती संभाजीनगर : मागील चार वर्षांपासून पीएच.डी. प्रवेश चाचणी (पेट) परीक्षा होण्यासाठी डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. विद्यापीठ प्रशासनाने 'पेट' परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पीएच.डी.च्या रिक्त जागांची आकडेवारी काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. त्यास विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनीही दुजाेरा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शेवटची पेट परीक्षा नोव्हेंबर २०२० मध्ये ऑनलाइन पद्धतीने घेतली होती. त्यानंतर आतापर्यंत 'पेट' परीक्षा घेण्यात आलेली नाही. मागील दोन वर्षांपासून 'पेट' परीक्षा घेण्याची मागणी संशोधन इच्छुक विद्यार्थ्याकडून करण्यात येत होती. विद्यापीठ प्रशासनाही मागील अनेक महिन्यांपासून 'पेट' परीक्षा घेण्याच्या घोषणाच करीत होते. मात्र, प्रत्यक्षात 'पेट' परीक्षा झालीच नाही. त्याच वेळी मागील काही महिन्यांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएच.डी.चे प्रवेश हे 'नेट' परीक्षेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार 'नेट' परीक्षांचे निकाल तीन टप्प्यांत जाहीर करण्यात येणार आहेत. त्यात जेआरएफ, 'नेट' उत्तीर्ण आणि पीएच.डी.साठी पात्रताधारकांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन 'पेट' परीक्षा घेणार की नाही, याविषयी मोठा संभ्रम निर्माण झाला होता. राज्यातील काही विद्यापीठांनी 'पेट' परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पीएच.डी.च्या रिक्त पदाची आकडेवारी मागविण्यात आली आहे.

शेकडो पीएच.डी. मार्गदर्शक वगळणार
यूजीसीच्या नियमानुसार विद्यापीठ प्रशासनाने पीएच.डी. मार्गदर्शकांच्या बाबतीत एक नियम बनवला आहे. त्यास विद्यापरिषद, व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. त्यामुळे हा नियम लागू झाला आहे. या नियमानुसार फक्त पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकांनाच पीएच.डी.चे मार्गदर्शन करता येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयात कार्यरत असलेली शेकडो पीएच.डी.चे मार्गदर्शक प्राध्यापक रिक्त संख्येतून वगळण्यात येणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

लवकरच परीक्षा 
पीएच.डी. प्रवेश परीक्षा घेण्याविषयी प्रशासनाने चर्चा केली आहे. त्या चर्चेनुसार पेट परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या पीएच.डी.च्या रिक्त जागांची आकडेवारी काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. यासंबंधित पुढील कार्यवाही कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.
- डॉ. वाल्मीक सरवदे, प्रकुलगुरू

Web Title: Good news for students! BAMU will soon conduct the 'PET' exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.