पर्यटकांसाठी खुशखबर! दौलताबादच्या कुशीतील मोमबत्ता तलावात सुरू होणार ‘बोटिंग’

By विजय सरवदे | Published: November 3, 2023 04:10 PM2023-11-03T16:10:43+5:302023-11-03T16:11:15+5:30

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्याचा हेतू

Good news for tourists! 'Boating' to start in Mombatta Lake in Daulatabad's Kushi | पर्यटकांसाठी खुशखबर! दौलताबादच्या कुशीतील मोमबत्ता तलावात सुरू होणार ‘बोटिंग’

पर्यटकांसाठी खुशखबर! दौलताबादच्या कुशीतील मोमबत्ता तलावात सुरू होणार ‘बोटिंग’

छत्रपती संभाजीनगर : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पाऊल पडते पुढे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्हा परिषदेने नौकाविहार प्रकल्पाचा संकल्प केला आहे. दौलताबादच्या कुशीत असलेल्या मोमबत्ता तलावात आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून ‘बोटिंग’ सुरू केली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले. तसा हा प्रस्ताव मागील ९ वर्षांपासून चर्चेत आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिजित चौधरी, मधुकरराजे आर्दड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वसंत सोळुंके यांनी याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. 

मोमबत्ता तलाव परिसर विकासाचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला होता. सन २०१५ मध्ये या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी शासनाने सव्वा कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यातील ६२ लाख रुपये खर्चून मोमबत्ता तलावाच्या ठिकाणी बोटिंगतळ, खिडकीघर, कॅन्टीन, वाहनतळ, स्वच्छतागृह, पर्यटकांसाठी इतर सुविधांचे कामे करण्यात आली होती. नौकाविहार चालविण्यास देण्यासाठी जिल्हा परिषदेने चार वेळा ई-निविदा काढल्या होत्या. मात्र, एकही सक्षम संस्था पुढे आली नाही. अखेर निधी खर्च न झाल्यामुळे तो शासनाला परत करावा लागला होता. आता तरी हा प्रस्ताव मार्गी लागावा, अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे.

आता विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी पुन्हा या प्रकल्पाला गती दिली आहे. १० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. यावेळी ग्रामीण पर्यटनाला चालना मिळावी, दौलताबाद, वेरुळ, म्हैसमाळ, सुलीभंजन, खुलताबाद येथील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा व परिसर विकासासाठी जिल्हा परिषदेने ३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यापैकी दौलताबाद जवळील मोमबत्ता तलाव परिसर विकासासाठी शासनाने १० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

लवकरच बोटिंगसाठी निविदा
प्राप्त निधीतून मोमबत्ता तलाव परिसराचा विकास केला जाईल. या तलावात बोटिंगसोबत घोडेस्वारीचाही आनंद पर्यटकांना घेता येईल. या जिल्ह्यातील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून ग्रामीण पर्यटनाला चालना देण्याचा प्रशासनाचा हेतू आहे. यातून ग्रामपंचायतीही आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. ‘बोटिंग’साठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.

Web Title: Good news for tourists! 'Boating' to start in Mombatta Lake in Daulatabad's Kushi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.