पर्यटकांसाठी खुशखबर!...आता अंधारात अधिक तेजाळणार 'दख्खनका ताज' अन् परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 02:11 PM2022-02-08T14:11:36+5:302022-02-08T14:11:55+5:30

बीबी का मकबरा अन् परिसरातील कलाकुसर अंधारल्यावरही पाहता येणार

Good news for tourists! ... Now the 'Deccan Crown' Bibi-ka-maqbara and its surroundings will be brighter in the dark | पर्यटकांसाठी खुशखबर!...आता अंधारात अधिक तेजाळणार 'दख्खनका ताज' अन् परिसर

पर्यटकांसाठी खुशखबर!...आता अंधारात अधिक तेजाळणार 'दख्खनका ताज' अन् परिसर

googlenewsNext

- योगेश पायघन

औरंगाबाद : बीबी का मकबऱ्यात सायंकाळी केवळ मुख्य इमारतीवर केवळ चारही बाजूंनी दिव्यांचा उजेड असतो. त्यामुळे सायंकाळी आलेल्या पर्यटकांना मकबरा बारकाईने पाहता येत नाही. त्यासाठी आता मकबऱ्यातील प्रत्येक कलाकुसरीवर दिव्यांनी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असून त्यामुळे रात्री दहा वाजेपर्यंत मकबरा परिसर रात्रीच्या वेळीही विद्युत रोषणाईने न्हाऊन निघालेला पर्यटकांना बघता येणार असल्याचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) कडून सांगण्यात आले.

मकबऱ्यासमोर ११ एकरांत पुरातत्त्व विभागाला उद्यान विकसित करायचे आहे. त्यासाठी सध्याच्या पार्किंगच्या बाजूने जाणारा २४ मीटरचा रस्ता वळवून लेणीकडे पुढे नेण्याचा प्रस्ताव मनपाकडे दिला आहे. आवश्यकता भासल्यास आणखी २ मीटर जागा ‘एएसआय’ देईल. मात्र त्यापेक्षा अधिक जागा देणे शक्य होणार नाही. असे झाल्यास निर्माण होणाऱ्या ११ एकरच्या उद्यानात वाॅकिंग ट्रॅक, उद्यानासह पर्यटकांना सोयीसुविधा असतील. या परिसरातील दोन ते तीन एकरमधील अतिक्रमण आहे. ते हटवल्यास त्या जागेवर दिल्ली, भाेपाळच्या धर्तीवर हाट, ओपन ॲम्फी थिएटर उभारल्यास मकबरा परिसर शहरातील आकर्षणाचे व विरंगुळ्याचे केंद्र होईल. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि मनपाकडून सहकार्य अपेक्षित आहे. या उद्यानासाठी काॅस्मो फिल्म्सकडून उद्यान विकासासाठी तर उद्यानाच्या देखभालीसाठी व्हेराॅक कंपनी सहकार्यासाठी तयार असल्याचे अधीक्षक मिलन कुमार चावले यांनी लोकमतला सांगितले. ८४ एकर जागा भारतीय पुरातत्त्व विभागाच्या नावावर झाली. ती जागा मोजून मार्किंग करून देण्याची मागणी एएसआयकडून करण्यात आली.

मिनारांचे होणार संवर्धन प्रस्तावित
मकबऱ्यातील मिनारांच्या प्लॅस्टरच्या खपल्या अनेक ठिकाणी पडल्या आहेत. तर काही मिनारचे भाग काळवंडले आहेत. मकबऱ्यातील संगमरवरी जाळ्या अनेक ठिकाणी तुटलेल्या असून त्यांच्या वैज्ञानिक संवर्धनासाठीची कामे पुढील वर्षात प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्याला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडून मान्यता मिळताच संवर्धनाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

कलाकुसर रात्रीही पर्यटकांना दिसेल...
विद्युत रोषणाई करण्यासाठी अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली. निविदा प्रक्रिया सुरु करण्यात परवानगी दिली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया होऊन दिवे लावण्याचे काम मार्च महिन्यात पूर्ण होईल. त्यामुळे सायंकाळी आलेल्या पर्यटकांनाही लख्ख प्रकाशात मकबऱ्यातील प्रत्येक भागातील कलाकुसर बघता येईल.
-डाॅ. मिलन कुमार चावले, अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, औरंगाबाद मंडळ

Web Title: Good news for tourists! ... Now the 'Deccan Crown' Bibi-ka-maqbara and its surroundings will be brighter in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.