खूशखबर! डिसेंबर अखेरपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार ५२ अभ्यासिकांचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 08:13 PM2024-07-26T20:13:20+5:302024-07-26T20:13:50+5:30
नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सन २०२२- २३ आणि सन २०२३-२४ या दोन वर्षांत मोठ्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी ५२ आधुनिक अभ्यासिका उभारल्या जात आहेत.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ५२ पैकी २५ अभ्यासिकांचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित २७ अभ्यासिकांचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन डिसेंबर अखेरपर्यंत त्या कार्यान्वित करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केला आहे.
नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सन २०२२- २३ आणि सन २०२३-२४ या दोन वर्षांत मोठ्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी ५२ आधुनिक अभ्यासिका उभारल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात १९, दुसऱ्या टप्प्यात ३३ अभ्यासिकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यासाठी जिल्हा नियोजन समितीने निधी मंजूर केला. सध्या यापैकी पहिल्या टप्प्यातील सर्व १९ आणि दुसऱ्या टप्प्यातील ६ अशा एकूण २५ अभ्यासिकांची कामे पूर्ण झाली आहेत. आता फर्निचर व विद्युतीकरणाची कामे सुरू असून ग्रामपंचायतींनी शक्य झाल्यास ‘सीएसआर’ फंड किंवा आपल्या परिसरातील माजी विद्यार्थी जे आज अधिकारी म्हणून विविध ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्याकडून देणगी स्वरुपात पुस्तके, संदर्भग्रंथ तसेच यूपीएससी, एमपीएससी यासह अन्य स्पर्धा परीक्षांसाठी स्टडी मटेरियल घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रचंड मेहनती आणि हुशार असतात. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना स्पर्धा परीक्षांपासून वंचित राहावे लागते. यूपीएससी, एमपीएससी यासह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करायची म्हटले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरात जावे लागते. मात्र, केवळ आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मोठ्या शहरात जाणे शक्य होत नाही. त्यासाठी विकास मीना यांनी जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या गावात अभ्यासिका असावी; जेणेकरून प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी बनण्याचे स्वप्न साकारता येईल. यासाठी त्यांनी पहिल्या टप्प्यात १९ व दुसऱ्या टप्प्यात ३३ अशा एकूण ५२ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी अभ्यासिकांचा उपक्रम हाती घेतला आहे.
फर्निचरसाठी ९ अभ्यासिकांना शासन निधी
जिल्ह्यातील ५२ पैकी ९ अभ्यासिकांना फर्निचर तसेच विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीकडून प्रत्येकी ८ लाखांचा निधी मिळाला आहे. यामध्ये पैठण तालुक्यातील बालानगर, विहामांडवा या दोन अभ्यासिकांसह छत्रपती संभाजीनगर- चौका, फुलंब्री- बाबरा, सिल्लोड- उंडणगाव, सोयगाव- फर्दापूर, वैजापूर- बोरसर, गंगापूर- सावंगी (ला.स्टे.), कन्नड- कुंजखेडा या अभ्यासिकांचा समावेश आहे.