खुशखबर ! क्रांती चौक पोलिस वसाहतीत ७८० निवासस्थाने होणार
By राम शिनगारे | Published: June 11, 2023 09:20 PM2023-06-11T21:20:07+5:302023-06-11T21:20:15+5:30
महामंडळाकडून कार्यवाहीला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर : पोलिस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांची निवासस्थाने वगळता इतर ठिकाणच्या निवासाची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. क्रांती चौक पोलिस वसाहतीमधील जागेवर नवीन घरांचा प्रकल्प राबविण्याची घोषणा अनेकवेळा करण्यात आली होती. मात्र, त्याठिकाणी आता ७८० निवासस्थानांचे बांधकाम करण्यास राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी पदवीधरचे आ. सतीश चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता.
शहरातील सर्वात जुन्या असलेल्या क्रांती चौक पोलिस वसाहतीची उभारणी १९६३ व टी.व्ही. सेंटर येथील वसाहतीची उभारणी १९८० मध्ये झाली. या दोन्ही वसाहतींची दुरवस्था झाल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी २९ डिसेंबर २०२२ रोजी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. २०१८ मध्ये या ठिकाणच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी शासनाने ७ काेटी रुपयांचा निधी दिला होता. तरीही या वसाहतींची दुरवस्था कायम राहिली. ड्रेनेजलाइन, सार्वजनिक शौचालये खराब झाली होती. पोलिस कर्मचाऱ्यांना अशा परिस्थितीत राहावे लागत असल्यामुळे त्याठिकाणी नव्याने इमारत बांधून पोलिस कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. या प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ३०६ पोलिस सेवा निवासस्थान प्रकल्पाच्या बांधकामास प्राधान्यक्रम ठरविण्याची कार्यवाही पोलिस महासंचालक कार्यालयाच्या स्तरावर सुरू असून, त्यात छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलिस वसाहतींना प्राधान्य देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार क्रांती चौक पोलिस वसाहतीमध्ये जुन्या इमारती पाडून ७८० शासकीय निवासस्थाने बांधण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. त्याविषयीचे पत्र पोलिस आयुक्तालयात नुकतेच प्राप्त झाले आहे.
महामंडळाकडून कार्यवाहीला सुरुवात
पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांनी आ.सतीश चव्हाण यांना पत्र पाठवून क्रांती चौक पोलिस वसाहतीत जुन्या इमारती पाडून नव्या इमारती उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे कळविले आहे. तसेच, राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांच्याकडून पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.