खुशखबर ! 'मराठवाड्याची लाईफलाईन' जायकवाडी धरणात ५१ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 08:08 PM2020-08-01T20:08:31+5:302020-08-01T20:10:35+5:30

मराठवाड्याची लाईफ लाईन असलेला जायकवाडी प्रकल्प यंदा स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पाण्याने भरत असल्याने मोठे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

Good news! 'Lifeline of Marathwada' 51% water storage in Jayakwadi dam | खुशखबर ! 'मराठवाड्याची लाईफलाईन' जायकवाडी धरणात ५१ टक्के जलसाठा

खुशखबर ! 'मराठवाड्याची लाईफलाईन' जायकवाडी धरणात ५१ टक्के जलसाठा

googlenewsNext
ठळक मुद्देदोन महिन्यात जलाशयाची पाणी पातळी चार फुटाने वाढली आहे जायकवाडी धरणात १ जून रोजी ३६.५५% जलसाठा होता.

- संजय जाधव

पैठण : जायकवाडी धरणाचा जलसाठा शनिवारी सकाळी @ ५१% झाला असून जायकवाडीच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने धरणात २२०२६ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे. विशेष म्हणजे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाण्यावर नेहमी अवलंबून असलेले जायकवाडी धरण या भागातून पाण्याचा एक थेंब आलेला नसताना यंदा ५१% भरले आहे. दुसरीकडे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहात मात्र अपेक्षेप्रमाणे अद्याप जलसाठा झालेला नाही. मराठवाड्याची लाईफ लाईन असलेला जायकवाडी प्रकल्प यंदा स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पाण्याने भरत असल्याने मोठे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

जायकवाडी धरणात १ जून रोजी ३६.५५% जलसाठा होता. दरम्यान जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद, कन्नड, वैजापूर, गंगापूर, पैठण, शेवगाव, नेवासा, कोपरगाव, शिर्डी, येवला, राहुरी आदी भागात दोन महिण्यात पावसाने सातत्य राखत जोरदार हजेरी लावली. या भागातील ( मुक्त पाणलोट क्षेत्र) पावसाचे पाणी विना अडथळा सरळ जायकवाडी धरणात येऊन मिळते. १ जून पासून धरणाच्या जलसाठ्यात मुक्त पाणलोट क्षेत्रातून  ४२३ दलघमी ( १५ टिएमसी) पाणी दाखल झाले असून जलसाठ्यात १४.५०%  वाढ झाली आहे. दोन महिन्यात जलाशयाची पाणी पातळी चार फुटाने वाढली आहे असे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.
जायकवाडी धरणात शनिवारी सायंकाळी १८४५.८५८ दलघमी (६५.१७ टिएमसी) एकूण जलसाठा झाला होता. या पैकी ११०७.७५२ दलघमी (३९.११ टिएमसी) उपयुक्त जलसाठा आहे. धरणात ५१% जलसाठा झाला असल्याचे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे व संदिप राठोड यांनी सांगितले. 
जायकवाडी धरणावर गत वर्षी आजच्या तारखे पर्यंत १२१ मि मी पाऊस झाला होता तर यंदा ५२९ मि मी पावसाची नोंद झालेली आहे. गतवर्षी आजच्या तारखेस जायकवाडीचा जलसाठा उणे ( - २.९६%) ईतका होता असे  धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.
जायकवाडी धरणात अपेक्षित जलसाठा झाल्याने धरणातून पिण्यासाठी व सिंचनासाठी नियोजना प्रमाणे पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  मोठा पावसाळा अद्याप बाकी असून ऑक्टोबर पर्यंत धरणात आवक सुरू असते त्यामुळे यंदा धरण १००% भरणारच अशी अपेक्षा अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली.


मराठवाड्यातील धरणात ५२.६४% जलसाठा.....
मांजरा व सिना कोळेगाव वगळता पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मराठवाड्यातील धरणात ५२.६४% उपयुक्त जलसाठा झाला  असल्याची माहिती अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली आहे. सिना कोळेगाव ( उणे - ९६%) व मांजरा ( उणे ४.४२%) असा जलसाठा आहे. ही दोन धरणे वगळली तर निम्न दूधना ३३.९९%, येलदरी ७८.४५%, सिद्धेश्वर ६१.७१%, माजलगाव ५८.५३%, पैनगंगा ५१.७६%, मानार ६५.८३%, निम्न तेरणा ०.५८% व विष्णूपुरी धरणात ८४.६१%, जलसाठा झाला आहे. या सर्व धरणातील एकूण उपयुक्त जलसाठा ५१५२.७९ दलघमी असून आज रोजी या धरणात २७१२.८१ दलघमी जलसाठा झाला आहे.

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा.....
गेल्या काही वर्षात नाशिक व अहमद नगर जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेल्या पाण्यावरच जायकवाडी अवलंबून होते. परंतु यंदा जायकवाडी धरणात ५१% जलसाठा झालेला असताना दोन्ही जिल्हातील धरणात अपेक्षित जलसाठा होऊ शकला नाही. जायकवाडीच्या उर्ध्व भागातील धरणाचा जलसाठा पुढील प्रमाणे.करंजवन १८.८२%, वाघाड ११.९५%, ओझरखेड ४०.५६%, पालखेड ३२.१७%, गंगापूर ५५.२२%, गौतमी २१.०७%, कश्यपी २४.९०%, कडवा २२.४५%, दारणा ६९.४३%, मुकणे २८.३७%,  भंडारदरा ४८.५०%, निळवंडे ४९.२४%,  मुळा ३३.३७% असा जलसाठा आजरोजी आहे.

Web Title: Good news! 'Lifeline of Marathwada' 51% water storage in Jayakwadi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.