मराठवाड्यासाठी आनंदवार्ता ! मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 03:21 PM2021-10-16T15:21:48+5:302021-10-16T15:26:25+5:30
Marathwada Water Issue : गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनुसार ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित ठेवून शुक्रवारी जलसंपदामंत्री पाटील यांनी अतिरिक्त पाणी वापराच्या संचिकेवर सही केली.
औरंगाबाद : विजयादशमीच्या मुहूर्तावर मराठवाड्यासाठी आनंदाची ( Marathwada Water Issue) बातमी आहे. मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी ( Central Godavari sub-basin) अतिरिक्त पाणी वापरास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी दिली असून, यामुळे पाण्याविना रखडलेल्या अनेक प्रकल्पांची कामे मार्गी लागणार आहेत. पाणी वापराचा तंटा सुटल्याने नवीन प्रकल्पांची कामे होणे शक्य होणार आहे.
गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनुसार ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित ठेवून शुक्रवारी जलसंपदामंत्री पाटील यांनी अतिरिक्त पाणी वापराच्या संचिकेवर सही केली. पूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी जलसंपदा विभागाने दूर केल्या आहेत. या त्रुटी दूर केल्यामुळे १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मंजुरी मिळाली. पूर्वीचे ६० टीएमसी आणि आताचे ६१.२९ टीएमसी म्हणजे १२१.२९ टीएमसी पाण्याचा वापर मध्य गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला करता येणार आहे. जे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते त्यातील काही प्रकल्पांत पाणी उपलब्धता आहे आणि उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले, तर सुरू करता येतील. या निर्णयामुळे बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील पाण्याचे प्रश्न व प्रकल्पांचे अडथळे दूर झाले आहेत.
विभागासाठी ऐतिहासिक निर्णय आहे
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी सांगितले, हा मराठवाड्यासाठी ऐतिहासिक निर्णय आहे. १९७५ पूर्वीचा पाणी वापर अबाधित ठेवून निर्णय झाला आहे. परभणी, नांदेड, बीड, हिंगोली जिल्ह्यांसाठी याचा लाभ होणार असून, नवीन काही प्रकल्प यामुळे शक्य होणार आहेत.
रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील
मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यातील मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९७५ चा पाणी वापर संरक्षित होता. त्यातील त्रुटी दुरुस्त केल्याने १९.२९ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. या संचिकेवर आजच सही केली आहे. मराठवाड्याला याचा फायदा होणार आहे. हे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते. ते पूर्ण करता येतील. बीड, हिंगोली, नांदेड येथील प्रकल्पांच्या अडचणी दूर होतील.
- जयंत पाटील, जलसंपदामंत्री