खुशखबर : कमवा शिका योजनेच्या विद्यार्थ्यांना आता १०० रुपये रोज
By योगेश पायघन | Published: February 8, 2023 07:30 PM2023-02-08T19:30:55+5:302023-02-08T19:31:01+5:30
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय, १३ मार्च रोजी पहिली बैठक अधिसभा बैठक
औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कमवा शिका योजनेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ नामविस्तार दिनी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी केलेल्या घोषणेवर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यार्थ्यांना ७० रुपयांऐवजी १०० रुपये प्रती दिवस तसेच महिन्याकाठी दोन हजारांवरून तीन हजार रुपये मानधन १ एप्रिलपासून पुढील सत्राच्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
व्यवस्थापन परिषदेची बैठक बुधवारी पार पडली. २०२३-२४ वर्षाच्या अर्थसंकल्पासंबंधीचे वार्षिक नियोजन, वार्षिक लेखे या बैठकीत मांडण्यात आले. या बैठकीला कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, डाॅ. गणेश मंझा, प्रदीपकुमार देशमुख, राज्यपाल नियुक्त सदस्य डाॅ. काशीनाथ देवधर, उच्च शिक्षण सहसंचालक डाॅ. सुरेंद्र ठाकूर, डाॅ. भारती गोरे, आदींची उपस्थिती होती. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित अधिसभा सदस्यांची पहिली बैठक १३ मार्च रोजी आहे. या बैठकीत व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुका होतील. कमवा शिका विद्यार्थ्यांना प्रती दिन ७० रुपये दिले जात आहेत. विद्यार्थ्यांना १०० रुपये प्रती दिन मानधन देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला असून, पुढील आर्थिक वर्षातील विद्यार्थ्यांना हा निर्णय लागू होईल, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले.
होतकरू विद्यार्थ्यांना होईल लाभ
वाढत्या महागाईत कमवा शिका योजनेत काम करूनही शैक्षणिक खर्च भागवून शिक्षण करणे अवघड बनले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हातभार लागावा, यासाठी कुलगुरू डाॅ. येवले यांनी नामविस्तार दिनी मानधन वाढीची घोषणा केली होती. त्या घोषणेवर व्यवस्थापन परिषदेत सकारात्मक निर्णय झाल्याने पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना दरमहा ३ हजार रुपये कमवा शिका योजनेतून मिळू शकतील. सध्या ४८० विद्यार्थी या योजनेत आहेत.