छत्रपती संभाजीनगर मनपाच्या सीबीएससी पाठोपाठ सेमी इंग्रजी शाळांना चांगला प्रतिसाद
By मुजीब देवणीकर | Published: May 30, 2024 08:02 PM2024-05-30T20:02:48+5:302024-05-30T20:03:23+5:30
तीन वर्षांपूर्वी मनपाने सहा सीबीएससी शाळाही सुरू केल्या. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर : इंग्रजी शाळांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले असून, महापालिकेने मागील वर्षीपासून सेमी इंग्रजी शाळा सुरू केल्या. इयत्ता पहिलीमध्ये दोन हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. हे विद्यार्थी यंदा दुसऱ्या वर्गात जातील. नवीन अडीच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा यंदा प्रवेश होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. तीन वर्षांपूर्वी मनपाने सहा सीबीएससी शाळाही सुरू केल्या. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महापालिकेच्या शहरात ६५ पेक्षा अधिक शाळा आहेत. १८ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. नारेगाव, किराडपुरा, बायजीपुरा, पडेगाव, हर्सूल, गारखेडा इ. भागांतील शाळांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी संख्या आहे. पूर्वी महापालिकेच्या शाळांमध्ये सर्वसामान्य गोरगरीब पालकांची मुलेच प्रवेश घेत असत. आता हा ट्रेंड बदलला आहे. खासगी शाळांमध्ये होणारी प्रचंड आर्थिक लूट लक्षात घेता, अनेक पालक मनपाच्या शाळांना प्राधान्य देत आहेत. महापालिकेच्या ५० पेक्षा अधिक शाळा अत्यंत स्मार्ट करण्यात आल्या आहेत. जवळपास ६५ कोटी रुपये स्मार्ट सिटी प्रशासनाने यावर खर्च केला. निव्वळ शाळाच स्मार्ट झालेल्या नाहीत, तर विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षणही दिल्या जात आहे.
मागील वर्षी प्रशासक जी.श्रीकांत यांनी ५० शाळा सेमी इंग्रजी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, जून महिन्यात इयत्ता पहिलीत सेमी इंग्रजीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. जवळपास २ हजार विद्यार्थी इयत्ता पहिलीत सेमी इंग्रजीसाठी दाखल झाले. त्याचप्रमाणे, सीबीएससी शाळांनाही दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीबीएससी शाळांचे वर्ग इयत्ता पाचवीपर्यंतच राहणार आहेत.
सेमी इंग्रजी म्हणजे काय?
सेमी इंग्रजीत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना इंग्रजीसह गणितही इंग्रजीत असते. पाचवीपासून विज्ञान विषयही इंग्रजीत शिकविण्यात येतो. शहरातील मनपाच्या ५० शाळांमध्ये सेमी इंग्रजीची सोय करण्यात आली आहे.
पाठ्यपुस्तकेही मोफत
केंद्र व राज्य शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत सरकारी, अनुदानित व महापालिका शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. मनपाने यंदा विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्रजीची स्वतंत्र पुस्तके मागविली आहेत.