गुगल मॅपवर 'संभाजीनगर' झळकले; संतप्त इम्तियाज जलील यांनी गुगलला विचारला जाब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 06:56 PM2022-07-19T18:56:21+5:302022-07-19T18:57:13+5:30

नामांतर प्रस्तावास केंद्रातून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असताना सोशल मिडीयावर शहर नामांतराचे वारे जोरात सुरु झाल्याने नवा वादाला तोंड फुटले आहे.

Google renamed Aurangabad on what basis? MP Imtiaz Jalil's angry question | गुगल मॅपवर 'संभाजीनगर' झळकले; संतप्त इम्तियाज जलील यांनी गुगलला विचारला जाब

गुगल मॅपवर 'संभाजीनगर' झळकले; संतप्त इम्तियाज जलील यांनी गुगलला विचारला जाब

googlenewsNext

औरंगाबाद: जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या मॅप सेवेत औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर आणि उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करण्यात आला आहे. तसेच टाटाची मालकी असलेल्या क्रोमा या इ-कॉमर्स साईटवर देखील असा बदल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या बदलामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले असून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत गुगलला कशाच्या आधारावर नामांतर केले असे विचारले आहे. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ साली सभेत औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला. तेव्हापासून शिवसेना आणि भाजप युतीने सर्व निवडणुका शहर नामांतराच्या मुद्द्यावर लढवल्या. मधल्या काळात भाजप-शिवसेना युतीची दोन वेळेस राज्यात सत्ता आली. दोन्ही वेळेस शहराचे नामांतर झाले नाही. मात्र, शिवसेनेने भाजपला सोडून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करत मुख्यमंत्री पद मिळवले. त्यानंतर राज्यात आलेल्या राजकीय भूकंपामुळे पद सोडण्याआधी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले. मात्र, शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने मुख्यमंत्री पद मिळवताच नामांतराला स्थगिती दिली. पुन्हा ठराव घेत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले. या निर्णयास एमआयएम, कॉंग्रेस आणि काही संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला. 

खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तर माजी नगरसेवकांनी कोर्टात धाव घेतली आहे. नामांतर एकीकडे जल्लोषाचा तर दुसरीकडे वादाचा विषय ठरत असताना जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या मॅप सेवेत शहराचा उल्लेख संभाजी नगर असा करण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. तसेच टाटाची मालकी असलेली ई-कॉमर्स कंपनी क्रोमाने देखील असा बदल केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, मॅप सेवेत शहराचा उल्लेख संभाजी नगर कशाच्या आधारावर केला असा सवाल खा. इम्तियाज जलील यांनी ट्विटकरून गुगलला विचारला आहे. राज्य सरकारने नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. केंद्रातून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असताना सोशल मिडीयावर शहर नामांतराचे वारे जोरात सुरु झाल्याने नवा वादाला तोंड फुटले आहे.  

Web Title: Google renamed Aurangabad on what basis? MP Imtiaz Jalil's angry question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.