गुगल भाषांतरीत पेपरमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:04 AM2021-03-14T04:04:46+5:302021-03-14T04:04:46+5:30
औरंगाबाद : किरकोळ तांत्रिक अडचणी व काही विद्याशाखांच्या पेपरमध्ये गुगल भाषांतरीत चुकीचे शब्द सोडले, तर शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
औरंगाबाद : किरकोळ तांत्रिक अडचणी व काही विद्याशाखांच्या पेपरमध्ये गुगल भाषांतरीत चुकीचे शब्द सोडले, तर शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आयोजित केलेला ‘पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेचा (पेट-२) दुसरा पेपर सुरळीत पार पडला. मात्र, याही पेपरमध्ये अनेक ठिकाणी सामूहिक कॉपी, उत्तरांसाठी तज्ज्ञाचे सहकार्य. नातेवाइकांकडून मदतीचे प्रकार घडले.
विद्यापीठाने शनिवारी सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान ‘पेट-२’चे आयोजन केले होते. ही ऑनलाइन परीक्षा ६ हजार २७३ विद्यार्थ्यांनी दिली. एकूण ४५ विषयांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत सुरुवातीला विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. विद्यापीठाने दिलेल्या लिंकवर परीक्षा क्रमांक व पासवर्ड टाकल्यानंतर विद्याशाखा निवडायची असते. मात्र, स्क्रीनवर अनेक विद्याशाखा दिसतच नव्हत्या. थोड्यावेळाने विद्याशाखा दिसल्या, तर विषय दिसत नव्हते. मग, हळूहळू विषयांची यादी अपलोड होत गेली. यासाठी सुरुवातीला २० ते २५ मिनिटे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. वृत्तपत्र विद्याशाखेच्या पेपरमध्ये दोन प्रश्नांची पर्यायी उत्तरे चुकीची देण्यात आली होती, तर अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये गुगल भाषांतरीत प्रश्न व पर्यायी उत्तरे चुकीची होती.
शनिवारी १३ मार्च रोजी सकाळी १० ते १ दरम्यान दुसरा पेपर घेण्यात आला. या पेपरसाठी ६ हजार ३८३ विद्यार्थ्यांपैकी केवळ ११० जण अनुपस्थित होते. या पेपरमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचण सोडविण्यासाठी विद्यापीठाने अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे व उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांना नियुक्त केले होते.
चौकट.......
१७ मार्च रोजी निकाल
परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले की, ‘पेट’च्या पहिल्या पेपरप्रमाणेच शनिवारचा दुसरा पेपरही मोबाइल, लॅपटॉप अथवा संगणकावर ऑनलाइन सोडविण्याची मुभा होती. या परीक्षेत १०० गुणांचे १०० प्रश्न होते. या परीक्षेसाठी सकाळी १० ते १ दरम्यानची वेळ विद्यापीठाने निश्चित केलेली असली, तरी एकदा लॉगिन झाल्यावर विद्यार्थ्यांना ९० मिनिटातच पेपर सोडविणे बंधनकारक होते. या पेपरचा निकाल १७ मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे.