जय भवानीनगरमध्ये गुंडांचा धुमाकूळ; तलवारींनी वाहनांची तोडफोड, दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 04:15 PM2024-01-03T16:15:19+5:302024-01-03T16:15:34+5:30

या घटनेतील वीसपेक्षा अधिक टवाळखोर मोकाटच

Goons rampage in Jai Bhawaninagar; Vandalizing vehicles with swords, stone pelting | जय भवानीनगरमध्ये गुंडांचा धुमाकूळ; तलवारींनी वाहनांची तोडफोड, दगडफेक

जय भवानीनगरमध्ये गुंडांचा धुमाकूळ; तलवारींनी वाहनांची तोडफोड, दगडफेक

छत्रपती संभाजीनगर : जय भवानीनगरमध्ये गुंडांनी खुलेआम हातात तलवारी घेऊन दहशत निर्माण केली. नागरिकांच्या घरावर दगडफेक करून मोठमोठ्याने आरडाओरड करून धमक्या दिल्या. त्यानंतर तलवारी, दगडांनी वाहनांची तोडफोड केली. सोमवारी रात्री १० ते ११ अशी तासभर गावगुंडांनी दहशत माजवली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात मध्यरात्री बॉबी झिंजुर्डे, मनोज पडूळ उर्फ लंगडा मन्या, लड्ड्या, सागर, सौरभ आघाव यांच्यासह काहीजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

जय भवानीनगरमध्ये राहणारा एक तरुण ३१ डिसेंबर रोजी भावासह बाहेरगावी गेला होता. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता परतल्यानंतर दोघे भाऊ एका दुकानात औषध घेण्यासाठी थांबले. तेव्हा तेथे सिगारेट ओढत असलेल्या बॉबीने त्यांच्या तोंडावर धूर सोडला. तो नशेखोर गुंंड असल्याने दोन्ही भावांनी त्याला विरोध केला. मात्र, बॉबीने त्यांच्याकडील ‘किरपाण’ देण्याची मागणी केली. तरुणाने त्याला नम्रपणे नकार दिला. मात्र, तरीही बॉबीने शिवीगाळ करून धमकी देत वाद घातला. घरापर्यंत पोहोचत आलेल्या भावांच्या मागे काहीवेळातच बॉबी व त्याचे अन्य वीस ते तीस साथीदार आरडाओरड करत धावत गेले व मारहाण सुरू केली.

...तर गंभीर घटना घडली असती
दोन भावांच्या मदतीला धावून आलेल्या नागरिकांवर गुंडांनी दगडफेक केली. हातातील तलवारी वर उंचावून आरडाओरड करत वाहनांची तोडफोड केली. नागरिक घाबरल्याने कोणीही बाहेर आले नाही. दोन्ही भावांनी एका ठिकाणी आश्रय घेतला. नागरिक बाहेर आले असते तर मोठी गंभीर घटना घडली असती, असे स्थानिकांनी सांगितले. दहशत निर्माण करून धमकावून आरोपी निघून गेले. त्यानंतर पोलिस आले.

मुकुंदवाडी पोलिस कुठे?
मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने लूटमार, रस्त्यावर वाद, घरफोड्यांच्या घटना घडत आहेत. सोमवारी खुलेआम गुंडांनी तलवारी नाचवून दहशत निर्माण केली. यातील काहींची ठाण्यातील काही 'विशेष' कर्मचाऱ्यांशी 'चांगली' ओळख असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, घटनेला चोवीस तास उलटूनही मुकुंदवाडी पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही. त्यामुळे मुकुंदवाडी पोलिसांच्या कार्यशैलीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

Web Title: Goons rampage in Jai Bhawaninagar; Vandalizing vehicles with swords, stone pelting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.