गोपाळ यांची बदली रद्द; पदभार मात्र नाही
By Admin | Published: February 16, 2016 11:42 PM2016-02-16T23:42:51+5:302016-02-16T23:45:27+5:30
परभणी : येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस़एऩ गोपाळ यांची झालेली बदली रद्द झाली आहे़
परभणी : येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस़एऩ गोपाळ यांची झालेली बदली रद्द झाली आहे़ असे असले तरी गोपाळ यांना रूजू करून घेण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे़ त्यामुळे त्यांना मंगळवारी परभणी पं़स़चा पदभार देण्यात आला नाही़
परभणी येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस़एऩ गोपाळ यांची सहा महिन्यांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे बदली झाली होती़ गोपाळ यांना १२ फेब्रुवारी रोजी कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते़ त्यानुसार २८ जानेवारी रोजी त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले होते़ याच दरम्यान, ११ फेब्रुवारी रोजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या परभणी दौऱ्यावर आल्या होत्या़ यावेळी त्यांच्याकडे काही कार्यकर्त्यांनी तक्रार करून बदली झाली असतानाही गोपाळ यांना कार्यमुक्त केले नसल्याचे सांगितले़ यावेळी पंकजा मुंडे यांनी गोपाळ यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते़ त्यानंतर गोपाळ यांना काही दिवसांपूर्वी कार्यमुक्तही करण्यात आले़ परभणी पंचायत समितीचा पदभार सहाय्यक गटविकास अधिकारी एस़ बी़ धाबे यांना देण्यात आला़ धाबे यांनी पदभार स्वीकारला आहे़ या पार्श्वभूमीवर गोपाळ यांची बदली रद्द करण्याचा चंग काही नेते मंडळींनी बांधला़ यासाठी मुंबई गाठली गेली़ त्यानंतर जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीने पुन्हा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे गोपाळ यांची बदली रद्द करण्याची शिफारस केली़ या शिफारशीला अन्य काही लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळाले़ मार्चएंडची कामे आहेत़ शिवाय गोपाळ हे लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत़ त्यामुळे त्यांची बदली रद्द करावी, अशी विनंती करण्यात आली़ आणि आश्चर्य म्हणजे सोमवारी गोपाळ यांची बदली रद्द केल्याचे आदेश मंत्रालयातून निघाले़ त्यानंतर गोपाळ यांनी बुधवारी जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुमरे यांची भेट घेतली़
दरम्यान, गोपाळ यांची बदली रद्द करण्यासाठी जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी दाखविलेल्या सक्रियेतेविषयी संशय व्यक्त होत आहे़ जिल्ह्यातील शासकीय कार्यालये अन्य जिल्ह्यात हलविली गेली़ त्यावेळेस या लोकप्रतिनिधींनी चकार शब्द काढला नाही़
जायकवाडीचे सर्वाधिक लाभक्षेत्र परभणी जिल्ह्यात असताना जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी या लोकप्रतिनिधींनी पुढकार घेतला नाही़ मग बदली झालेल्या व तक्रार असलेल्या अधिकाऱ्यांची बदली रद्द करण्यात या लोकप्रतिनिधींनी स्वारस्य का दाखविले? असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे़ (जिल्हा प्रतिनिधी)